सांगोल्यात दीड लाखांचे डाळींब लंपास, डाळींब उत्पादकात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱयाच्या डाळिंब बागेत विक्रीयोग्य झालेले सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे डाळिंब चोरटय़ांनी चोरून नेल्याची घटना तालुक्यातील वासूद येथे घडली. या घटनेने डाळिंब बागायतदारांत खळबळ उडाली आहे.

वासूद येथील शेतकरी प्रशांत केदार यांची 2 एकर शेती असून, त्यामध्ये भगवा जातीची डाळिंबाची 400 झाडे आहेत. सध्या बागेतील डाळिंब विक्रीसाठी तयार झाले असल्याने 28 फेब्रुवारी रोजी केदार कुटुंबातील सदस्य दिवसभर डाळिंबाचे बागेत काम करून सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घरी गेले होते. दुसऱया दिवशी (दि. 1 मार्च) सकाळी 10 वाजता घरातील सर्वजण शेतातील डाळिंबाच्या बागेत गेले. त्यावेळी संपूर्ण बाग फिरून पाहिली असता विक्रीयोग्य झालेली बागेतील बहुतांश डाळिंब चोरी झाल्याचे केदार यांच्या लक्षात आले.

केदार यांनी आजूबाजूच्या परिसरात तसेच सांगोला, आटपाडी, मंगळवेढा इत्यादी ठिकाणी त्यांचे डाळिंब विक्रीस आले आहे का? याबाबत शोधाशोध व चौकशी केली. मात्र, डाळिंबाबाबत काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सांगोला पोलिसांत डाळिंब चोरीची तक्रार दाखल केली. त्यामध्ये अंदाजे 150 रुपये प्रतिकिलो दराचे 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे एक टन विक्रीस आलेले डाळिंब चोरटय़ांनी चोरून नेल्याचे प्रशांत केदार यांनी नमूद केले आहे.