
सामना प्रतिनिधी । उरण
शहरांतील रस्त्यांवर इमारतींसमोर वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होते. त्याबाबत महापालिका धोरण का ठरवत नाही, असा प्रश्न उपस्थित करून नव्या बांधकामांना परवानगी देतानाच, महापालिकेचे वाहनतळाचे धोरण ठरवायला हवे, असे मत नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी व्यक्त केले. तसेच वाहतूक नियंत्रणाला गती आणण्यासाठी शहरात वाहनळ उभारले जावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पनवेल महापालिका क्षेत्रातील शहरांमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त आहेत. वाहतूक शाखेची यंत्रणा नियंत्रणाऐवजी फक्त कारवाईचा बडगा उगारण्यात व्यस्त असल्याने वाहतूक नियंत्रणाला ग्रहण लागल्याची तक्रार पनवेल संघर्ष समितीने सोमवारी आयुक्तांकडे केली. तसेच महापालिका क्षेत्रांतील शहरांमधील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची विनंती करणारा प्रस्ताव त्यांना सादर केला. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.
सिंगापूरच्या आदर्श वाहतूक व्यवस्थेचे त्यांनी शिष्टमंडळाला उदाहरण दिले. तिथे वाहने विकत घेतली जात नाहीत तर रजिस्ट्रेशन क्रमांक विकला जातो. आपल्याकडे ती मानसिकता नाही. वाढत्या लोकसंख्येसोबत वाहन खरेदी केली जात आहे. त्यामुळे वाहने कमी होणार नाहीत. त्यावर महापालिकेने नव्या इमारतींना परवानगी देताना वाहनतळाची व्यवस्था करणारे धोरण निश्चित करावे, असे सांगितले.
वाहतूक पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांना निर्देश देवून येत्या आठवड्यात पनवेल महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडीबाबत संबंधित अधिकार्यांची बैठक घेऊन संघर्ष समितीच्या सुचनेनुसार कृती आराखडा तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळात कांतीलाल कडू, डॉ. भक्तीकुमार दवे, चंद्रकांत शिर्के, मंगल भारवाड, सुरज म्हात्रे आदींचा समावेश होता.
























































