
शिवसेना-मनसे युतीच्या घोषणेकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे आणि मुंबई-महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ती वेळ जवळ आली असून येत्या दोन दिवसांत शिवसेना-मनसे युतीची घोषणा होईल, अशी माहिती शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन युतीबाबत घोषणा करतील, असे ते म्हणाले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे. त्यात निवडणुकीसाठी रणनीती ठरवली जात आहे. आजही दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
दोन्ही पक्षांची चर्चा आणि जागावाटप पूर्ण झाले आहे. कुणी कुठे लढायचे यावर एकमत झाले आहे. कोणतीही अडचण दिसत नाही. ज्या अडचणी होत्या त्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालून दूर केल्या आहेत. सर्व कार्यकर्त्यांचे समाधान होईल याची काळजी दोन्ही पक्षांनी घेतली. आजची शेवटची बैठक होती असे आम्ही मानतो आणि येत्या एक-दोन दिवसांत युतीबाबत रितसर घोषणा होईल, असे संजय राऊत म्हणाले.
काँग्रेसचे मन वळवण्याचा प्रयत्न
काँग्रेसने मुंबईत स्वबळावर लढण्याचे ठरवले आहे. काँग्रेस नेत्यांशी संवाद साधणार का, असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता, संजय राऊत म्हणाले, ‘काँग्रेस हा महाविकास आघाडीतील एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसची स्वतःची व्होट बँक आहे. राज ठाकरे यांच्याबाबत त्यांच्या काही भूमिका आहेत. मात्र भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व घटक आपल्याला सोबत घ्यावे लागतील हे काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना आम्ही सांगितले. काँग्रेसचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहोत. अजून 72 तास आहेत. आमच्यात कोणतीही कटुता नाही. काँग्रेस वेगळी लढत असेल तर एकमेकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करू.’




























































