सत्य बोलल्याबद्दल गिरीश महाजनांचे मी आभार मानतो!

‘शिवसेना फोडणे हे आमचे मिशन होते जे आम्ही पूर्ण केलं आणि त्याचा आम्हाला आनंद आहे’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर विधान करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांचे मी आभार मानतो असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपच्या या नेत्याने शिवसेना कोणी आणि का फोडली यामागचे सत्य सांगितल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानत असल्याचे राऊत यांनी म्हटले. ‘आपण राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिवसेना सोडली, आपण शरद पवार यांच्यामुळे शिवसेना सोडली’ हे गद्दारांचे दावे गिरीश महाजन यांनी खोडून काढले आहेत.

दै.सामनामध्ये “भाजपचे मिशन! आता बोला!!” हा अग्रलेख बुधवारी प्रसिद्ध झाला आहे. या अग्रलेखाची संपूर्ण देशात चर्चा सुरू असून या अग्रलेखावरून पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना राऊत म्हणाले की, ‘भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांसमोर एक विधान केलं, त्यावर सामनाने म्हटले आहे की महाजन काय म्हणाले की, “शिवसेना फोडणे हे आमचे मिशन होते जे आम्ही पूर्ण केलं आणि त्याचा आम्हाला आनंद आहे” हे विधान त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केलं जे अत्यंत गंभीर आहे. म्हणजे आम्ही महाविकास आघाडीमुळे, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवारांमुळे पक्षातून बाहेर पडलो हा दावा करण्यात येत होता, त्यावर महाजनांनी पडदा टाकला. शिवसेना आम्ही फोडली, भाजपला शिवसेना फोडायचीच होती, शिवसेना फोडल्याशिवाय महाराष्ट्राचे ३ तुकडे करता येणार नाही. महाराष्ट्र फोडण्यात शिवसेनेचा अडथळा असेल असंच गिरीश महाजन यांना सुचवायचं होतं. पण मी गिरीश महाजन यांचे आभार मानतो की भाजपच्या एका नेत्याने सत्य सांगितलं की शिवसेना कोणी आणि का फोडली.’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफांवरील छापेमारीसंदर्भाती प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, जे एका विचारधारेविरोधात आहेत त्यांच्याबाबत गेल्या काही वर्षांपासून अशा पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी पडत आहे. मुश्रीफ हे लढवय्ये, संघर्ष करणारे आणि संकटाशी सामना करणारे नेते आहेत. ते या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत.

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, आम्ही मागणी केली आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगात कोणताही निर्णय घेऊ नये. स्वतंत्र म्हणवून घेणाऱ्या स्वायत्त संस्थांवर आज जे राजकीय दवाब आहेत, ते ताणतणाव आम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. पक्षपात किंवा निपक्षपात काय असतो हे आम्हाला त्या घटनेच्या खुर्चीवर बसणाऱ्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे अनेकदा दिसतो. राजकीयदृष्ट्या देशातील वातावरण हे निर्मळ किंवा स्वच्छ राहिलेलं नाही.