
मिंधे गट हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदनीय शब्द वापरतात. पण बाळासाहेब त्यांना अजिबात वंदनीय नाहीत. फार तर त्यांना नरेंद्र मोदी, अमित शहा वंदनीय आहेत. बाळासाहेब वंदनीय असते तर त्यांच्या विचारांनी ते पुढे गेले असते. कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा निषेधाचा साधा शब्द काढला नाही. मुंबई तोडण्याचे कारस्थान सुरू असून त्याबाबतही निषेधाचा साधा शब्द नाही. मग यांना बाळासाहेब कसले वंदनीय? कशाला ही नाटके, ढोंग करतात. त्यांना मोदी, शहा वंदनीय आहेत. पण बाळासाहेब आम्हाला वंदनीय आहेत असे बोलणे म्हणजे बाळासाहेबांचा आणि संपूर्ण मराठी जणांचा अपमान करण्यासारखे आहे. ही ढोंग, नाटके लवकरच बंद पडतील, असा जबरदस्त हल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. मंगळवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.
अमित शहा, मोदींना मुंबईवर संपूर्ण ताबा मिळवण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे मुंबईत ते भाजपचाच महापौर करतील आणि अडीच वर्षानंतर कुणाला काही मिळणार नाही. शिंदेसेना ही भाजपची अंगवस्त्र आहे. किती वेळ रुसून बसणार? फार तर एखादी आवडीची साडी चोळी पदरात पाडून घेईल, बाकी काही नाही. मुळात यांच्या हातात आहे काय? यांना दिल्लीतून अमित शहांनी डोळे वटारले असतील. कारण तो त्यांचा पक्ष आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
…तर त्यांना कोपरापासून दंडवत
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना विरोध करणे किंवा महात्मा फुलेंचा अपमान करणाऱ्यांना विरोध करणे हा विचार जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संकुचितपणा वाटत असेल तर मी त्यांना कोपरापासून दंडवत घालतो, असेही संजय राऊत म्हणाले. आमचे सरकार पाडून तुम्हाला सत्तेवर आणण्यासाठी बेकायदेशीरपणे मदत केली हा विषय बाजुला ठेवा. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महात्मा फुले, सावित्री फुले यांचा अपमान करणाऱ्यांना पद्मभूषण दिल्याचे मुख्यमंत्री समर्थन करत असतील तर या भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीला काय बोलावे? देशद्रोही तर म्हणता येणार नाही, कारण यांच्यासारखे राष्ट्रभक्त जगात नाहीत, अशी तिरकस टीकाही राऊत यांनी केली.
…तर महाराष्ट्र हे नाव घेण्याचा अधिकार त्यांना आहे का?
कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला त्यावेळेलाही फडणवीस यांनी त्यांच्या वक्तव्यावर सारवासारव केली होती. त्यांना असे म्हणायचे नव्हते… या थाटात ते बोलले होते. महाराष्ट्राच्या अपमान होतो तेव्हा सारवासारव करण्याची जबाबदारी दिल्लीने त्यांच्यावर दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्र फुले यांचा अपमान करणाऱ्यांचा मोदी गौरव करणार असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे समर्थन करणार असतील तर महाराष्ट्र हे नाव घेण्याचा अधिकार त्यांना आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी केला.
माणसं फोडणे, विकत घेणे आणि निवडणुका लढवणे हीच त्यांची लोकसेवा; संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
सर्वपक्षीय बैठकीचा वर्षानुवर्षाचा फार्स
दरम्यान, 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, सर्वपक्षीय बैठकीचा वर्षानुवर्षाचा फार्स खेळला जातो. विधानसभेच्या वेळी विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर, बहिष्कार टाकतो. अशी पद्धत दिल्लीत नाही. त्यामुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, सत्ताधारी पक्षाचे संसदीय कार्यमंत्री येतात आणि सर्वांशी चर्चा करतात. पण त्या चर्चेत एखाद्या विषयावर चर्चा करण्यासंदर्भात ज्या मागण्या असतात त्या मान्य होतील असे नाही. तरीही एकत्र बसून निर्णय घेण्याची ही फार मोठी संसदीय परंपरा आहे. अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख एक फेब्रुवारी असते, ती चुकू नये, परंपरा तुटू नये म्हणून रविवारी संसद सुरू ठेवलेली आहे आणि आम्ही सगळे त्याला उपस्थित राहू.

























































