मिंधे भाडोत्री सैन्यासारखे; ते भाजपवर उलटल्याशिवाय राहणार नाहीत; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-raut

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युव्रेनविरुद्ध लढण्यासाठी ठेवलेले भाडोत्री सैन्यच शेवटी त्यांच्यावर उलटले. मिंधे गट हे भाजपचे भाडोत्रीच; अशा बाजारबुणग्यांना घेऊन राज्य करता येत नाही. त्यामुळे हे भाडोत्री भाजपवर उलटल्याशिवाय राहणार नाहीत, अशी सणसणीत चपराक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावली आहे.

सातारा जिल्हा दौऱयावर आले असता खासदार संजय राऊत कराड येथे पत्रकारांशी बोलत होते. मिंधे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर त्यांनी शेलक्या शब्दांत निशाणा साधला. या देशात मी म्हणजे सर्वस्व, मी म्हणजे मालक हे दिल्लीतही कधी चालले नाही, गल्लीत कधी चालणार? येथे कुणीही मालक होऊ शकत नाही. कारण येथे लोकशाही आहे. दिल्लीतही आहे आणि पाटणमध्येही आहे. मी म्हणजे राज्य असा अहंकार वाढतो त्यावेळी लोक पाडतात. आता ती वेळ आली आहे. यावेळी ते पडणारच, असा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. बाळासाहेब देसाई यांना जनता लोकनेते का म्हणत होती, याचा त्यांच्या नातवाने अभ्यास करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे चाळीसजण सती चालले होते काय?

गद्दारीचा प्रयोग फसला असता तर एकनाथ शिंदे डोक्यात गोळी मारून घेऊन आत्महत्या करणार होते, या मंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता, केसरकर यांनी इतकी महत्त्वाची माहिती लपवून ठेवल्याबद्दल पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे, असा पलटवार खासदार राऊत यांनी केला. मिंधे डोक्यात गोळी मारून घेणार होते तर त्यांच्यासोबत ते 40 लोकही सती चालले होते काय? असा मिश्कील सवालही त्यांनी केला.

… तर तो गादीचा अपमान होत नाही का?

इतर कोणी काही बोलले तर तो गादीचा अपमान होतो, मग तुम्ही रस्त्यावर एकमेकांचे वाभाडे काढले तर तो गादीचा अपमान होत नाही का, असा रोखठोक सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रराजे यांना उद्देशून केला आहे. होय, हा गादीचा अपमानच आहे, असे त्यांनी सांगितले.