
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिंधे गट व भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. नांदेड शहरात देखील प्रचारादरम्यान मिंधे गटाचे आमदार व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नांदेडमध्ये प्रत्येक क्षेत्रातून पैसा जमवायचे काम अशोक चव्हाण यांनी केले असून मला नेहमी प्रश्न पडतो की हे भाकरी खातात की नोटा? अशी टीका शिरसाट यांनी केली आहे.
मिंधे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुभाष पाटील किन्हाळकर व इतर प्रभागातील सदस्य पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक २ मध्ये दि.२५ नोव्हेंबर रोजी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची सभा होती. याप्रसंगी शिरसाट म्हणाले, या क्षेत्राचे नेतृत्व कै.शंकराव चव्हाण यांच्या काळापासून चव्हाण कुटूंबातील सदस्य पिढी दर पिढी करत आले आहेत. परंतु राजकारणाच्या माध्यमातून मोठमोठी पद भुषवलेल्या कुटुंबीयाकडून या परिसराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. केवळ उड़्डाणपूल व लोकवस्ती नसलेल्या भागात रस्ते केले म्हणजे विकास नाही. तुमच्या भागातील युवक, मजूर, कामगार इतर शहरात, राज्यात जावून रोजगारी करत आहेत, परंतु औद्योगिक वसाहतीच्या फलकाचे केवळ उद्घाटन करुन साधा एखादा उद्योग आपल्या शहरात अद्यापपर्यत आणलेला नाही. ना हे बेरोजगारांच्या हाताला काम देऊ शकले नाहीत. शिवाय जिल्ह्यातील प्रत्येक मोठी एजन्सी यांच्याच नावे असून प्रत्येक क्षेत्रातून पैसा जमवायचे काम चव्हाण यांनी केले असून, हे भाकरी खातात का नोटा असा प्रश्न पडला आहे.


























































