
आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अर्थात एआयच्या अनेक करामती आपल्यासमोर येत आहेत. अशाच एका एआय करामतीने सारे थक्क झाले आहेत. 55 वर्षीय सारा इझेकिएल यांच्यासोबत जे घडले ते खरोखरच एक चमत्कार आहे. एआयच्या मदतीने सारा इझेकिएल यांना 25 वर्षांपूर्वी गमावलेला आपला आवाज परत मिळाला आहे. त्यांना 25 वर्षांपूर्वी मोटर न्यूरॉन आजाराचे निदान झाले. या आजारात मानवी शरीराच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. यामुळे बोलण्यास, गिळण्यास आणि चालण्यासही त्रास होतो. नंतर, हळूहळू आवाजही जातो. सारा यांच्या बाबतीतही असेच घडले. आता कुटुंबाकडे असलेल्या एका आठ सेकंदांच्या जुन्या व्हिडीओ क्लिपचा वापर करून, सारा यांचा आवाज परत आणण्यात आला.
सारा यांच्या सापडलेल्या जुन्या क्लिपमध्ये त्या त्यांच्या मुलीशी बोलत होत्या. या क्लिपमधून वैज्ञानिकांनी सारा यांच्या आवाजाचा आठ सेकंदांचा ऑडीओ नमुना घेतला. त्याचा वापर करून एआयला प्रशिक्षण देण्यात आले. याद्वारे, साराच्या आवाजाचा स्वर, पिच आणि बोलण्याची पद्धत कशी होती? हे सांगण्यात आले. या प्रशिक्षणाच्या आधारे, एआय मॉडेलने एक कृत्रिम आवाज विकसित केला. हा आवाज अगदी सारा इझेकिएल यांच्या आवाजासारखाच वाटतो.
आता सारा बोलण्यासाठी एक खास टेक्निकचा वापर करतात. यासाठी त्या त्यांच्या डोळय़ांच्या सहाय्याने कम्प्युटरवर टाइप करतात. यानंतर, एआय साराने लिहिलेले आपल्या आवाजात बोलते. अशा प्रकारे, सारा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत स्वतःच्या आवाजात बोलू शकतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आनंद झाला आहे.