
ब्रिटिशांबद्दल द्वेष दाखवण्यात आल्याचे कारण पुढे करत विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंग’ हा चित्रपट फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्युरींनी ‘ऑस्कर’च्या यादीतून वगळला आहे. निवड समितीने दिलेल्या या अजब कारणावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत निवड समितीचे सदस्य इंद्रदीप दासगुप्ता म्हणाले, ‘सरदार उधम सिंग’ हा चित्रपट आणि जालियनवाला बाग घटनेवर आधारित असून स्वातंत्र्यलढय़ातील नायकावर भव्य चित्रपट बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, परंतु चित्रपटात आपला ब्रिटिशांबद्दलचा द्वेष समोर येतो. जागतिकीकरणाच्या युगात एवढा द्वेष बाळगणे ही चांगली गोष्ट नाही. निवड समितीचे दुसरे सदस्य सुमित बसू म्हणाले, “चित्रपटातील सिनेमॅटोग्राफी, कॅमेरावर्क, एडिटिंग, त्या काळातील चित्रण सर्वांना आवडले आहे, परंतु चित्रपटाची लांबी हा मुद्दा आहे. जालियनवाला बाग हत्याकांडातील शहीदांच्या वेदना जाणवायला प्रेक्षकांना बराच वेळ लागतो.’’ 94 व्या ऑस्कर सोहळ्यासाठी हिंदुस्थानकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘कूझंगल’ची निवड झाली आहे. यंदा 14 चित्रपट शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. यामध्ये विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंग’, विद्या बालनचा ‘शेरनी’ यांच्यासह ‘कारखानीसांची वारी’, ‘आता वेळ झाली’, ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटांचादेखील समावेश होता.




























































