दीड हजारांची लाच घेताना सहदुय्यम निबंधक सुर्यवंशीला अटक, लाचलुचपत प्रतिबंधकची साताऱ्यात कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील खाबुगिरी आज पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली आहे. आधीच कार्यालयातील चिकन बिर्याणी पार्टीमुळे कार्यालयाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगलेला सहदुय्यम निबंधकच आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळय़ात सापडला आहे. उदय धनाजी सूर्यवंशी (वय 42, रा. पुणे) असे या लाचखोर अधिकाऱयाचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हे पेशाने वकील असून, त्यांच्या अशिलांची कर्ज प्रकरणासाठी आवश्यक असलेली ‘नोटीस ऑफ इंटिमेशन’ची पाच प्रकरणे या कार्यालयाकडून लटकवून ठेवण्यात आली होती. पुन्हा पुन्हा त्यामध्ये त्रुटी काढल्या जात होत्या. त्यामुळे तक्रारदारांनी सहदुय्यम निबंधक सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी ही प्रकरणे मंजूर करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच मागितली. त्याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केल्यानंतर आज दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना सूर्यवंशीला रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य, प्रशांत नलावडे, तुषार भोसले यांनी ही कारवाई केली. उदय सूर्यवंशी याच्याबद्दल अनेकांच्या तक्रारी असून, त्याने लोकसेवकाची भूमिका विसरून कार्यालयात राजरोसपणे केलेली चिकन बिर्याणी पार्टी वादाच्या भोवऱयात सापडली होती. ते प्रकरण सोशल मीडियावरून मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाल्याने कार्यालयाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले होते