
सामना प्रतिनिधी । खेड
खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या देवणे डोहावर खेड-खारी दरम्यान नव्या पुलाची उभारणी केली जात असून या पुलामुळे खाडीपट्टय़ातील गावांची दळणवळणाची फार मोठी समस्या कायमस्वरुपी निकाली निघणार आहे. हा पुल वाहतुकीला खुला झाल्यावर खाडीपट्टा परिसरातील नागरीकांचा सुमारे सहा किलोमीटरचा हेलपाटा कमी होणार असल्याने नागरिकांच्या दृष्टीने हा पुल अतिशय महत्वाचा ठरणार आहे.
खेड तालुक्यातील खाडीपट्टा परिसरात खारी, सुसेरी, संगलट, शेरवली, नांदगावं कोरेगाव, सवणस, आमशेत, पन्हाळजे, रजवेल, बहिरवली अशी अनेक गावे आहेत. या गावांमध्ये जाण्यासाठी खेडहून नारिंगी पुल मार्गे सुसेरी, खारी बहिरवली हा ४१ किलोमीटरचा मार्ग आहे. अतिवृष्टीदरम्यान जगबुडी व नारिंगी नदीला पुर आला की खारी दरम्यानचा छोटा पुल पाण्याखाली जात असल्याने पावसाळ्यात हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. पुल पाण्याखाली गेला की या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे ठप्प होते आणि खाडीपट्टय़ाचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटतो. खाडीपट्टय़ातून शाळा, महाविद्यालयामध्ये आलेले विद्याथी, दैनंदिन कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी आलेले ग्रामस्थ खेडमध्येच अडकून पडतात.
पावसाळ्यात खाडीपट्टा पसिरातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता खेड आणि खारी दरम्यानच्या देवणे डोहावर पुल उभारण्यात यावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली होती. या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांच्याकडून नव्या पुलाचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला ४ सप्टेंबर २०१५ रोजी मान्यता मिळाली आणि भुसंपादनासाठी ७०० कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली.
निधी उपलब्ध झाल्यानंतर आवश्यक असलेली तांत्रिक मान्यताही मिळाली आणि १९ जुलै २०१६ च्या करारानुसार पुलाचे काम येथील मनिषा कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीला देण्यात आले. सद्यस्थितीत पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु असून दोन अबटमेंट, तीन पिलर एक गर्डर स्लॅब ही कामे झालेली आहे.
खाडी पट्टय़ातील गावांना जोडणाऱया या पुलाची जमिनीपासून उंची ५ मीटर इतकी असून रुंदी १०.५ मीटर इतकी आहे. पुलाची एकूण लांबी १०० मीटर असून २५ मीटरचे चार गाळे असणार आहेत. मार्च अखेर पुलाचे काम पुर्ण होण्याची शक्यता असून हा पुल वाहतुकीस खूला झाल्यास खाडीपट्टय़ाचा प्रवास सुमारे ६ किलोमिटरने कमी होणार आहे.




























































