
पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेला भयंकर हल्ला ही मोदी सरकारची चूकच होती. जवानांना जम्मूहून श्रीनगरला एअरलिफ्ट करण्यासाठी मी विमानांची मागणी केली होती. पण गृहमंत्रालयाने विमाने दिली नाहीत. मोदी सरकारची अकार्यक्षमता आणि हलगर्जीपणामुळे हल्ला झाला आणि जवानांचे प्राण गेले, असा खळबळजनक गौप्यस्फोट जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याविषयी कोणाला काही बोलू नका, गप्प बसा असे मला सांगितले होते, अशी माहितीही मलिक यांनी दिली होती. मलिक यांच्या या दाव्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेप घेतला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना शहा यांनी म्हटले की आमची साथ सोडल्यानंतरच त्यांना या सगळ्या गोषअटी कशा काय आठवायला लागल्या ? सत्तेत असताना तुमचा अंतरात्मा जागा का होत नाही ?
शहा यांनी सत्यपाल मलिक यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून या सगळ्या गोष्टींवर ते राज्यपाल असताना का बोलले नाहीत असा सवाल शहा यांनी विचारला आहे. राज्यपाल असतानाच त्यांनी या गोष्टी बोलायला हव्या होत्या. हे विषय सार्वजनिक चर्चेचे विषय नाहीत असे शहा यांनी म्हटले आहे. शहा यांनी म्हटले की भाजपने असे कोणतेही काम केलेले नाही जे लपवण्याची पाळी येईल. कोणी आपल्या राजकीय स्वार्थासाठी एखादी गोष्ट करत असेल तर त्याचे मूल्यांकन माध्यमांनी केले पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती पदावर नसते तेव्हा पत आणि किंमत दोन्ही घसरते असेही शहा यांनी म्हटले.
तो भित्रा आहे, सीबीआयच्या मागे लपतोय! सत्यपाल मलिक यांना समन्स येताच केजरीवाल यांचा हल्लाबोल
























































