तो भित्रा आहे, सीबीआयच्या मागे लपतोय! सत्यपाल मलिक यांना समन्स येताच केजरीवाल यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमध्ये 2019 ला झालेल्या पुलवामा हल्ल्याबाबत गौप्यस्फोट करणारे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Former J&K Governor Satyapal Malik) यांना सीबीआयने समन्स पाठवले आहे. यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीही मोदी सरकारवर आसूड ओढले. भीतीच्या काळामध्ये सत्यपाल मलिक यांनी मोठे धैर्य दाखवले असून संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याचे केजरीवाल म्हणाले.

जम्मू-कश्मीरातील जलविद्युत प्रकल्प आणि विमा योजनेत भ्रष्टाचार झाला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीत केला होता. याच मुलाखतीत त्यांनी मोदी सरकारच्या चुकीमुळेच 2019मध्ये पुलवामा येथे भयंकर दहशतवादी हल्ला होऊन 40 जवान शहीद झाले होते, असेही म्हटले होते. त्यानंतर लगेच मलिक यांना सीबीआयने नोटीस बजावली असून 27 व 28 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

सत्यपाल मलिक यांना सीबीआय समन्स येताच अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला. मलिक यांनी केलेल्या एका ट्विटला केजरीवाल यांनी रिप्लाय देत मोदींवर टीका केली. ‘भीतीच्या काळामध्ये तुम्ही मोठे धैर्य दाखवले असून संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. या महान देशावर जेव्हा संकट आले तेव्हा तुमच्या सारख्या लोकांनी धैर्याने त्याचा सामना केला. तो भित्रा आहे, सीबीआयच्या मागे लपला आहे. तो अशिक्षित, भ्रष्ट आणि गद्दार आहे. तो तुमच्याशी स्पर्धा करू शकत नाही’, असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

सीबीआयचे समन्स येताच सत्यपाल मलिक यांनी एक ट्विट केले होते. ‘मी खरं बोलून लोकांची पापं जगासमोर आणली आहेत. कदाचित त्यामुळेच मला बोलावलं गेलं आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, घाबरणार नाही. सत्यासोबत कायम उभा राहीन’, असे मलिक यांनी म्हटले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

प्रकरण काय?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या आरोग्य विमा योजनेत (ग्रुप इन्शुरन्स स्किम) भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. तसेच जम्मू-कश्मीरातील किरू जलविद्युत प्रकल्पाचे 2200 कोटींना कंत्राट दिले त्यातही घोटाळा झाल्याचा मलिक यांचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने 2 एफआयआर दाखल केले आहेत. सीबीआयने 7 महिन्यांत दुसऱ्यांदा नोटीस बजावून मलिक यांच्याकडे खुलासा मागितला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चौकशी केली होती.