चंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा

198

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

चंद्रपूर शहराच्या इतिहासात आज एका वेगळ्या शिस्तबद्ध मोर्चाची नोंद झाली. ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण नको या मागणीसाठी राज्यात ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चाचे आयोजन केले जात आहे. चंद्रपुरात याच मागणीसाठी एका मूक मोर्चाचे आयोजन केले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो नागरिक धडकले आणि सरकारला आपल्या भावना कळविल्या.

चंद्रपूरच्या गांधी चौकातून ‘सेव मेरीट-सेव नेशन’ या अभियानांतर्गत निघालेला मूक मोर्चा प्रचंड खदखद दर्शवून गेला. गुणवंत प्रवर्गाच्या ५० टक्क्यात पुन्हा आरक्षण नको, ही अभियानाची प्रमुख मागणी आहे. देशातील सर्वाधिक पुरोगामी राज्य समजले जाणारे महाराष्ट्र आता सर्वाधिक आरक्षण देणारे राज्य ठरणार आहे. मराठा आरक्षणाच्या शिक्कामोर्तबासह राज्यात आरक्षणाची मर्यादा 80 टक्‍क्‍यांवर गेली असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी धनगर आरक्षणासाठी वेगळ्या चार टक्क्यांचा विचार करण्याचे विधान केले आहे. विविध राज्य सरकारांनी घटनेतील तरतुदीना राजकीय लांगूलचालनासाठी हरताळ फासत आरक्षणाची मर्यादा वाढवत नेल्याने गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण -भरतीत संधी नाकारली जात आहे. याचाच परिणाम म्हणून खुल्या प्रवर्गात मोडणा-या सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी आता Save Merit-Save Nation नावाचे आंदोलन सुरू केले आहे.

या मोर्चातील महिला आणि विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. आरक्षणाच्या तरतुदींची पाच वर्षानंतर समीक्षा करा, क्रिमीलेयरची मर्यादा आखून द्या, बढतीत आरक्षण रद्द करा, खोटे वेतन प्रमाणपत्र काढून आरक्षण घेण्याला कठोर कारवाईची तरतूद करा या मागण्याही करण्यात आल्या.

आगामी काळात हे आंदोलन विविध राजकीय मंचावर शक्ती दाखविण्यासाठी वापरले जाण्याचे संकेत असून खुल्या प्रवर्गातील लाखो गुणवंतांना हे आंदोलन आता नवी राजकीय गरज वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या