‘ओमकार’चा बंदोबस्त करा, शेतकरी उद्यापासून आंदोलन करणार

सावंतवाडी तालुक्यातील कास, मडुरा आणि सातोसे गावांच्या परिसरात ’ओमकार’ हत्तीने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या हत्तीचा त्वरित बंदोबस्त न केल्यास मंगळवारपासून शेतातच बसून आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच हत्तीचा उपद्रव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 27 सप्टेंबरपासून या परिसरामध्ये हत्ती फिरत आहे. वनविभागाच्या दिरंगाईमुळे संतप्त शेतकऱयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱया कोणत्याही परिस्थितीला वनविभाग सर्वस्वी जबाबदार असेल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.