
सावंतवाडी शहरातील वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात संकष्ट चतुर्थीनिमित्ताने 21 दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाला आज गणेशभक्तांनी सुमारे 6 हजार मोदकांचा प्रसाद अर्पण केला.
गणेशोत्सवानिमित्त सोमवारी संकष्टी दिवशी सकाळी 6.30 वाजता श्रींची महापूजा करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. या वेळी श्रींच्या महापूजेचा मान ज्येष्ठ नागरिक अण्णा म्हापसेकर व अक्षया म्हापसेकर यांना मिळाला. यानंतर वेदपाठशाळेच्या बटूनी श्री अथर्वशीर्ष पठण केले. त्यानंतर दुपारी महाआरती झाल्यावर श्रींना 6,528 मोदक अर्पण केले. या वेळी भाविक प्रकाश मिशाळ, महादेव गावडे, शरद सुकी, मृणाल चेंडके, संकेत शिरसाट, वैभव म्हापसेकर, धोंडी दळवी, मंगेश परब, लघुरुद्र-आनंद नेवगी, पंचखाद्य प्रसाद, डॉ. गोविंद केसरकर, झकास मित्र मंडळ उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या 21व्या दिवशी सोमवार 9 ऑक्टोबरला मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन संस्थानकालीन मोती तलावात थाटामाटात केले जाणार आहे. या विसर्जन मिरवणुकीत वाद्यवृंद, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत. गणेशभक्तांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वैश्यवाडा हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव समितीने केले आहे.




























































