मृत व्यक्तिच्या पीपीएफ खात्यातील 1.39 कोटींवर दावा, एसबीआयच्या मॅनेजरसहित दोन जणांना बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्याच्या जगात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. हे गुन्हे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढल्या जात आहेत. अनेक लोक अशा युक्त्यांमध्ये अडकून लाखो रुपये गमावून बसले आहेत. आता चोरांनी आपला मोर्चा मृत व्यक्तींकडे वळवला आहे. एका मृत व्यक्तिच्या नावे खोटी कागदपत्रं बनवून पीपीएफ खात्यातून 1.39 कोटी रुपयांवर दावा ठोकण्यात आला आहे. या आरोपींमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा एका मॅनेजरही सहभागी असल्याची माहिती मिळत आहे.

अमित प्रसाद असं या मृत व्यक्तिचं नाव आहे. अमित यांचा 2008मध्ये अमेरिकेत मृत्यू झाला होता. त्याच्या वडिलांनी 2009मध्ये अमित याच्या खात्यातील पैसे आपल्या खात्यात वळवण्यासाठी संपर्क साधला होता. अनेकदा संपर्क साधल्यानंत बँकेच्या एका अधिकाऱ्याने मॅनेजर अमृतलाल पटेल यांना पीपीएफमधील रकमेच्या पुढील प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी नेमलं. पण, पटेल याने काम केलं नाही. त्यामुळे 88 वर्षांच्या हनुमंत प्रसाद यांनी पैसे मिळण्याची आशा सोडून दिली होती.

मात्र, त्यांच्याखेरीज या पैश्यांवर आणखी एक दावा आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून एसबीआयचा व्यवस्थापक प्रियांक शर्मा, हवाला ऑपरेटर राजेश पांचाळ, पद्म सेन या तिघांना अटक केली असून त्याखेरीज या प्रकरणातील 2 आरोपींचा शोध सुरू आहे.