
ठाणे येथे उभारण्यात येत असलेल्या ‘मेट्रो-4’ प्रकल्पासाठी झाडांची कत्तल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशानुसार स्थगिती दिली. येत्या दोन आठवडय़ांपर्यंत ही स्थगिती लागू राहणार असून या काळात या प्रकल्पासाठी एकही झाड तोडता कामा नये असेही सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि संबंधित प्राधिकरणाला बजावले आहे. या प्रकल्पा संदर्भात ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवा असेही खंडपीठाने यावेळी म्हटले आहे.
वडाळा-कासारवडवलीला जोडणार्या ठाण्यातील ‘मेट्रो-4’ प्रकल्पासाठी झाडांची कत्तल करण्यास मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिली असून हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानेही कायम केला आहे. त्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते रोहित जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची आज दुपारी वरील खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सदर स्थगिती आदेश देण्यात आले. आजपासून येत्या दोन आठवडय़ांपर्यंत ठाण्यातील एक झाडही तोडता कामा नये असे बजावतानाच खंडपीठाने राज्य सरकार आणि संबंधित प्राधिकरणांना त्यांची बाजू मांडण्यासही सांगितले आहे. तसेच अर्जदार जोशी यांना याचिकेत दुरुस्ती करण्याचेही आदेश दिले.


























































