आई-वडील एकत्र राहत नाहीत, वाशीतील शाळेने विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला

39

सामना ऑनलाईन, नवी मुंबई

आई आणि वडील एकत्र राहत नाहीत म्हणून वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेने दुसरीला एका चिमुरडय़ाचा प्रवेश नाकारला आहे. शाळेच्या या मनमानीविरोधात पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सुजाता मोहिते यांचा मुलगा पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकत होता. मात्र सदर शाळाही आयसीएसई बोर्डाची आहे. त्यामुळे सुजाता यांना आपल्या मुलाचा प्रवेश वाशी येथील सेंट लॉरेन्स शाळेत घ्यायचा होता. शाळेने प्रवेश देण्याचे मान्य केले. मात्र सुजाता या एकटय़ाच राहतात, असे समजल्यावर शाळेच्या मुख्याध्यापिकेने त्यांच्या मुलाला प्रवेश देण्यास नकार दिला. विभक्त राहणाऱ्या पती-पत्नीच्या पाल्यांना प्रवेश देत नाही असे अजब कारण त्यांनी दिले. इंग्रजी शाळांची ही मुजोरी उघडकीस आल्यानंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. ज्या मुलांचे आई किंवा वडिलांचे निधन होते, त्यांच्या मुलांनी काय शाळेत न जाता घरीच बसायचे का, अशी खंत सुजाता यांनी व्यक्त करून शाळेच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या