विद्यार्थ्यांना रिक्षात कोंबून वाहतूक करणाऱ्या चालकांवर कारवाई करा!

149

सरकारने कोणतीही परवानगी दिलेली नसतानाही बेकायदेशीरपणे रिक्षात प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोंबून त्यांची वाहतूक करणाऱ्या चालकांना हायकोर्टाने आज फैलावर घेतले. अशा प्रकारच्या बेकायदा वाहतुकीमुळे अपघात होण्याचीच शक्यता जास्त असल्याचे स्पष्ट करत हायकोर्टाने नियम मोडणाऱ्या या वाहनचालकांवर कारवाई करा असे आदेश आज राज्य सरकारला दिले. तसेच पुढील सुनावणीवेळी कारवाईसंदर्भातील अहवाल सादर करण्यासही सरकारला बजावले.

याप्रकरणी ‘पीटीए युनायटेड फोरम’ पालक आणि शिक्षकांच्या संघटनेने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, ऑटो रिक्षामध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणापेक्षा जास्त कोंबून त्यांची करण्यात येणारी वाहतूक कारवाईस पात्र आहे. राज्य सरकारने तशी कोणतीही परवानगी रिक्षाचालकांना दिलेली नाही. किंबहुना विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता अशी परवानगी यापुढेही दिली जाणार नाही.

हायकोर्टाचे सरकारला आदेश,पालकांनीही काळजी घेतली पाहिजे!

सुनावणीवेळी हायकोर्टाने याचिककर्त्या पालकांनाही खडसावले. आपल्या पाल्याची सुरक्षितता लक्षात घेता त्यांना शाळेत सोडण्यासाठी अशा वाहनातून पाठवता कामा नये याची त्यांनी दखल घेतली पाहिजे असे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या