दुसऱ्या टप्प्यात लोकशाहीच्या महाउत्सवात दिग्गजांचे मतदान

सामना प्रतिनिधी, मुंबई

लोकशाहीच्या महाउत्सवात महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघांसह देशभरात लोकसभेच्या 95 जागांसाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, आनंदराव अडसूळ यांच्यासह दिग्गज नेत्यांनी मतदान केले. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री जीतेंद्र सिंह, द्रमुक नेते डी. राजा, अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते राज बब्बर हे निवडणुकीच्या रणांगणात नशीब अजमावत आहेत.
75 वर्षांवरील व्यक्तीने निवडणूक लढवू नये!

75 वर्षांवरील व्यक्तीने निवडणूक लढवू नये या मताचा मी आहे. मी यंदा निवडणूक लढवणार नव्हतो, परंतु 2014 मधील पराभवानंतर मला पुन्हा निवडणूक लढवण्याचा आग्रह करण्यात आला. जनतेच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवत आहे, मात्र ही यंदाची माझी शेवटची निवडणूक असेल, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. सोलापूरमध्ये पराभवाची भीती वाटल्यानेच भाजपने डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना उमेदवारी दिल्याचा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, सुशीलकुमार शिंदे, पत्नी आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
आमदार पंकजा मुंडे, खासदार आणि महायुतीच्या बीडच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.