
दिल्लीतील गर्दीची धार्मिक स्थळे आणि वारसा स्थळांवर पाकिस्तानस्थित लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून हल्ला होण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या माहितीनंतर राजधानीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून कडक चांदणी चौक, लाल किल्ला परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदनी चौक परिसरातील एक मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असू शकते. लाल किल्ल्याजवळील संवेदनशील क्षेत्रांसह इतर गर्दीच्या ठिकाणी ‘आयईडी’द्वारे स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याचा संशय आहे. 6 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथील एका मशिदीत झालेल्या स्फोटाचा बदला घेण्यासाठी लश्कर-ए-तोयबा हा कट रचत असल्याचे सांगण्यात येत आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून जुन्या दिल्लीतील धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. संपूर्ण परिसरावर कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. तसेच वाहनांची कसून तपासणी केली जात असून अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथक आणि क्विक रिएक्शन टीम्स यांना स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे. ‘इंडिया टूडे‘ने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.
लाल किल्ल्याजवळ तीन महिन्यांपूर्वी झालेला स्फोट
गेल्या वर्षी 10 ऑक्टोबर रोजी लाल किल्ल्याजवळ कार बॉम्बस्फोट झाला होता. लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर 20 हून अधिक जखमी झाले होते. या घटनेनंतर देशभरात छापेमारी करत उच्चशिक्षित दहशतवाद्यांना आणि त्यांच्या हस्तकांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा दिल्लीत स्फोटाची शक्यता वर्तवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.



























































