
ज्येष्ठ नागरिकाच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन घरातून मंगळसूत्र व मोबाईल चोरणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 1 लाख 29 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चैतन्य शिरीष गोगटे (वय 21, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिवदीन जनार्दन कुलकर्णी (वय 77, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.
कुलकर्णी यांच्या घरातून 27 नोव्हेंबर रोजी 1 लाख 25 हजार रुपयांचे मंगळसूत्र व मोबाईल असा 1 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास सुरू केला. तक्रारदाराकडे अधिक माहिती घेतल्यानंतर घरी कोणकोण येते व जाते याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चैतन्य गोगटे याच्यावर संशय आला. याच दरम्यान एकजण करंजे नाका परिसरात चोरीचे साहित्य विक्री करण्यास येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एलसीबी पथकाने त्यानुसार सापळा लावला असता, संशयित चैतन्य गोगटे पोलिसांना मुद्देमालासह सापडला. पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करून संशयिताला अटक केली. पुढील तपासासाठी संशयिताचा ताबा शाहूपुरी पोलिसांकडे देण्यात आला.
जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, फौजदार अमित पाटील, पोलीस उत्तम दबडे, विजय कांबळे, अतिश घाडगे, संजय शिर्के, शरद बेबले, प्रवीण फडतरे, गणेश कापरे, विशाल पवार, सचिन ससाणे, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, शिवाजी गुरव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
























































