
सामना ऑनलाईन, नागपूर
नागपुरमध्ये सकाळपासून मुसळधार पावसामुळे विधानसभेचे कामकाज स्थगित करावे लागले. विधीमंडळाच्या पॉवर सब स्टेशनमध्ये पाणी भरल्याने विधानभवनची वीज गेली. जोरदार पावसामुळे आमदार विधीमंडळाच्या बाहेर पडू शकले नाही आणि मेणबत्ती लावून आत बसून राहिले. तर दुसरीकडे खराब हवामानामुळे मुंबईहून नागपुरला निघालेले इंडिगो विमान हैद्राबादमध्ये उतरावे लागले.
पावसाळी अधिवेशनाला सकाळी १० वाजता सुरूवात झाली. तासाभरानंतर विधीमंडळाची वीज गेली. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुर्ण दिवसासाठी कामकाज स्थगित केले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुर्ण विदर्भात सकाळपासून पावसाचा जोर होता. नागपुरच्या अनेक भागांत गुडघ्यापर्यंत पाणी होते. शहराच्या डोबीनगर आणि जोगीनगर भागात ७-८ फूट पाणी भरले आहे. आज सकाळी ८.३० ते ११.३० पर्यंत १६२.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने १७ राज्यात हाय ऍलर्ट जाहीर केलाअसून कोकण-गोवा पट्ट्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

























































