
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईच्या विविध भागांत आज गौरी आणि गणपतीला निरोप देण्यात आला. लाडक्या बाप्पासोबतच माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईला निरोप देण्यासाठी विविध नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि महापालिकेने खास बनविलेल्या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मंगळवारी गौरी-गणपतीला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांच्या गजराने अवघी मुंबापुरी दुमदुमून गेली होती. विसर्जन मिरवणुकांमध्ये लहान मुलांसह महिला, युवा व वृद्ध सारेच उत्साहाने सहभागी झाले. अनेक घरगुती गणपतींसह काही मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करत मिरवणुका काढल्या. अनेक ठिकाणी पारंपरिक लोकनृत्यांचे सादरीकरणही करण्यात आले. वाजतगाजत, नाचत गणरायांना निरोप देण्यात आला. पाऊस नसल्याने गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 26,395 मूर्तींचे विसर्जन झाले. त्यामध्ये 257 सार्वजनिक तर 23,216 घरगुती गणपती आणि 2,922 गौरींचे विसर्जन झाले.
कृत्रिम तलावांना प्राधान्य
मुंबई महापालिकेच्यावतीने गणेश भक्तांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था केली होती. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, दादर, तसेच शहरातील विविध भागांमध्ये तयार केलेल्या कृत्रिम तलावांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक विसर्जन स्थळी प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची पथकेही सज्ज ठेवण्यात आली होती. तसेच, पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे यासाठी कृत्रिम तलावांना प्राधान्य देण्यात आले होते.