
खडकीतील दारूगोळा फॅक्टरीमधून पुन्हा चंदनाची सात झाडे चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरुषोत्तम कुमार (वय 58, रा. रेंजहिल खडकी) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूगोळा फॅक्टरीमध्ये कुमार ज्युनिअर वर्कर मॅनेजर म्हणून काम करतात. 19 ते 20 जून दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फॅक्टरीच्या बोट क्लब परिसरात असलेली सात चंदनाची झाडे तोडली. त्या झाडांचा सात इंचापर्यंतचा गाभा असलेला 70 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील अतिस्फोटक निर्माणीमध्ये असलेली आठ चंदनाची झाडे चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. खडकीतील दारूगोळा फॅक्टरीचा भाग अतिसुरिक्षत म्हणून ओळखला जातो. तरीही चोरट्यांकडून येथील चंदनाची झाडे चोरी झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.


























































