सातवीच्या विद्यार्थ्यांनी बनवली इलेक्ट्रिक सायकल, पायडल न मारताच चला सुसाट!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, नवी मुंबई

पेट्रोलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत असल्याने अनेकजण जुनं ते सोनं म्हणत पुन्हा सायकलकडे वळू लागले आहेत. मात्र नवी मुंबईतील सातवीच्या विद्यार्थ्यांनी वेगळा प्रयोग करत चक्क इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. पायडल न मारता सुसाट जाणारी ही सायकल विज्ञान प्रदर्शनात सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या अनोख्या ‘मेक इन इंडिया’ची निर्मिती करणाऱया या मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नेरुळ सेक्टर 12 मध्ये असलेल्या शिक्षण प्रसारक विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात प्रणव दारकुंडे, जय पडवळ आणि सुदर्शन घोडके या विद्यार्थ्यांनी बॅटरीवर चालणाऱया इलेक्ट्रिक सायकलचा प्रोजेक्ट सादर केला. त्यांच्या या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष नामदेव भगत आणि अन्य शिक्षकांनी कौतुक केले आहे. ही सायकल तयार करण्यासाठी या विद्यार्थ्यांना या शाळेचे शिक्षक सुनील परदेशी यांनी मार्गदर्शन केले आहे.

आरओमधील मोटारीचा वापर
सायकल बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी घरात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱया आरओमधील मोटारीचा उपयोग केला असून मोटरसायकलमध्ये वापरल्या जाणाऱया 12 व्हॉल्टच्या दोन बॅटरी जोडल्या आहेत. सायकलच्या मागील चाकाला दोन फेरवेल बसवण्यात आले आहेत. त्यामुळे ही सायकल बॅटरीवरही चालते आणि चार्जिंग संपल्यानंतर ती पायडलवरही चालवता येऊ शकते.