अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला 20 वर्षांची सक्तमजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने 20 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा आणि 43 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे, तर मुलाने केलेले कृत्य माहित असूनही दुर्लक्ष करणाऱ्या वृद्ध महिलेला 1 हजार रुपये दंड आणि 10 दिवसांची साधी कैद शिक्षा ठोठावली आहे.

अनुराग मोतीराम बावकर (30, रा. वाटूळ, ता. राजापूर) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना जुलै 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत घडली आहे. पीडित मुलीचे आई-वडील घरात नाहीत याचा फायदा घेऊन तिच्याशी आरोपी वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. याबाबत कुणाला महिती दिलीस, तर तुझे नाव खराब करेन अशी धमकीही देत होता. याविरोधी पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या आजीला सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने या घटनेकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पीडित मुलगी मुंबई येथे आपल्या मावशीकडे गेली होती. तेथेही ती गप्प-गप्प असायची, तसेच पुन्हा गावाकडे जाण्यास तिने नकार दिला. सारखी रडत होती. मावशीने का जायचे नाही, असे विचारल्यानंतर अल्पवयीन मुलीने मावशीला घडलेला प्रकार सांगितला. तिच्या आजीला याविषयी कळले तेव्हा तिने दुर्लक्ष केल्याचे सांगितले.

मुलीच्या मावशीने मालवणी पोलीस ठाणे-मुंबई येथे तक्रार दिली, मात्र राजापूर तालुक्यातील घटना असल्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा राजापूर पोलीस ठाण्यात वर्ग केला होता. तत्पूर्वी पोलिसांनी पीडीत मुलीची वैद्यकीय तपासणी केली होती. राजापूर पोलीस ठाण्यात तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एल. मैले करत होते. पोलिसांनी आरोपी बावकर याच्याविरुद्ध भादवी कलम 376 (एन), 376 (ए व बी) 354, 354 अ, 377, 506, तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 2012 अन्वये गुन्हा दाखल केला होता, तर पीडितेच्या आजीने मुलाने केलेले कृत्य समजूनही दुर्लक्ष केले या प्रकरणी तिच्यावरही पोलिसांनी भादवी कलम 202 व पॉस्को कलम 19 (1) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी संशयितास अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. आज या खटल्याचा निकाल विशेष पॉस्को न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे 10 साक्षीदार तपासण्यात आले, तर आरोपीच्या वकिलातर्फे आरोपीसह तीन साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अॅड. पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले. दोन्ही पक्षांच्या युक्तीवादाअंती न्यायालयाने आरोपीला 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि 43 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला, तर वृद्ध आजीला मुलाने गुन्ह्याचे कृत्य करून दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोषी ठरवून 1 हजार रुपये दंड व 10 दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावली.