
श्रीमहाराज सहजसंचारी होते याचा प्रत्यय बहुतकरून सोलापूर, नाशिक, पुणे, अकलूज व नगर येथील भक्तांनी घेतला आहे. नगर येथे श्रीमहाराजांचे अनेकदा येणेजाणे होत असे, तसेच त्यांचे वास्तव्यदेखील होत असे. हे वास्तव्य ‘नगर’च्या पंचक्रोशीतील ज्या भक्तांकडे विशेषकरुन होत असे त्यामध्ये सरदार नानासाहेब मिरीकर, हरीभाऊ पारखी, सरदार थोरात, आबासाहेब श्रोत्रीय, बागोबा कुकडे, रावबहादूर नवले, दादा कारखानीस, डॉ. नागेश धनेश्वर, रावसाहेब निसळ यांचा समावेश होता. यातील काही भक्तमंडळींसोबत एकत्रितपणे घेण्यात आलेले श्रीशंकर महाराजांचे छायाचित्र आजदेखील ‘नवरत्न दरबार’ म्हणून प्रसिद्ध आहे.
एकदा रावबहादूर नवले श्रीमहाराजांकडे ‘विष्णू भगवंताची चरणकमले पाहावयास मिळावी’ असा आग्रह धरते झाले. तेव्हा श्रीमहाराज नवले यांना सोबत घेत जवळच्या नदीपात्रात उभे राहिले आणि म्हणाले, ‘हे पहा विष्णूपद !’ नवले खाली वाकून पाहतात तो नदीपात्राला व्यापून टाकणारे लांबलचक विष्णूपद त्यांना दिसले. ते हाताने विष्णूपद चाचपू लागले मात्र त्यांना विष्णुपदाच्या लांबीरुंदीचा थांग लागेना. संभ्रमित झालेल्या नवले यांनी वर पाहिले तेव्हा त्यांना थेट गगनाला भिडलेल्या महाकाय विष्णूरूपाचे दर्शन घडले. श्रीमहाराजांनी धारण केलेल्या त्या विष्णुरूपाचा मुकुट पार अवकाश भेदून पलीकडे गेल्याचे जाणवतांच रावबहादूर नवले नतमस्तक झाले. याचप्रमाणे श्रीशंकर महाराजांनी एकदा अण्णासाहेब थोरात यांना श्रीसाईबाबांच्या रूपामध्ये दर्शन दिले त्यामुळे अण्णासाहेबांना परमधन्यता वाटली.
एकदा श्रीशंकर महाराज नगर येथून पाथर्डीकडे पायी चालले असता रस्त्यात एके ठिकाणी अचानकपणे थांबले आणि आपला मोर्चा नजीकच्या घनदाट जंगलाच्या दिशेने वळविते झाले. त्या परिसरातील ‘वृद्धेश्वर’ नामक प्राचीन अन् पौराणिक महत्त्व सांगणाऱया स्थानावर श्रीमहाराज गेले अन् मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या दगडी धुनीवर हात ठेवून त्यांनी ‘अल्लख’ असा जोरदार पुकारा केला. त्यासरशी तेथे अग्नी प्रज्वलित झाला. ही धुनी नाथपंथीय सत्पुरुष श्रीमच्छिंद्रनाथ यांनी जागृत केली होती. कालांतराने हे स्थान वर्दळीचे न राहिल्याने येथील धुनी तशीच पडून गेली. श्रीमहाराजांनी मात्र ती धुनी प्रज्वलित करून जणू नाथसंप्रदायाला नव्याने चालना दिली.
नगर परिसरातील वांबोरी तीर्थ तसेच गर्भाद्री वा गर्भगिरी पर्वताचा परिसर हे वाल्मीकी ऋषींचे साधनस्थळ असून येथील डोंगररांगामध्ये श्रीमच्छिंद्रनाथ, श्रीगोरक्षनाथ व श्रीजालंदरनाथ या नाथपंथीय सिद्धांच्या समाध्या आहेत. नाथसंप्रदायामध्ये ‘वृद्धेश्वर’ किंवा ‘म्हातारदेव’ हे श्रीशंकराला उद्देशून केलेले संबोधन आहे. ‘वृद्धेश्वर’ मंदिराशेजारी असलेल्या ‘ज्ञानवापी तीर्थ’ येथे श्रीज्ञानेश्वर माऊलींनी श्रीज्ञानेश्वरीची पहिली ओवी रचली होती. येथून थोडय़ा अंतरावर कानिफनाथांची ‘मढी’ आहे. या सर्वच ठिकाणी श्रीमहाराजांचे नित्य येणेजाणे असे.
एकदा श्रीमहाराज नगरला आले असता गोसावी नावाचे गृहस्थ त्यांच्यासोबत होते. एकदा श्रीमहाराज गोसावी यांच्यासोबत बाहेर निघाले आणि कबरस्तानात जाऊन एका कबरीजवळ बसले. दोन हिंदू माणसे कबरीजवळ बसल्याचे पाहून तेथे काही मुस्लिम मंडळी लाठय़ाकाठय़ा घेऊन जमा झाली. मात्र श्रीमहाराजांना सामोरे जाता त्यांना ‘तिथून उठा’ असे म्हणण्याचे धाडस कुणालाही झाले नाही. एव्हाना बरीच गर्दी जमा झाली तेव्हा एकाएकी त्या मुस्लिम मंडळींतील काहीजणांना श्रीमहाराजांमध्ये अनेक स्वरूपांची दर्शने घडू लागली. हा अजब प्रकार पाहून सर्व मुस्लिम मंडळी भारावली. त्या सर्वांना श्रीमहाराजांची नेमकी कोणती प्रचीती आली न कळे, मात्र ते सर्वजण श्रीमहाराजांच्या स्तुतीपर आनंदाने कव्वाली वगैरे म्हणू लागले. श्रीमहाराज कबरस्तानात तीन दिवस मुक्काम करते झाले आणि त्या मुस्लिम मंडळींनी उत्साहाने ‘उरूस’ साजरा झाला. ही मंडळी श्रीमहाराजांना अतिशय आदराने ‘बडे आदम मालिक’ म्हणत असत. हा अनुभव त्या गोसाव्यासाठी विलक्षण होता. तो गोसावी तेथून पुढे वाशिम आणि त्यानंतर कारंजा येथे गेला आणि समाधिस्थ झाला.


























































