भाजपविरोधात एक व्हा! शरद पवारांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरात निवडणुकीत भाजपाचा एकतर्फी विजय होईल याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. कारण सगळी देशाची सत्ता त्यासाठी वापरली गेली होती. गुजरातच्या सोयीचे अनेक निर्णय केंद्राने घेतले होते. महत्त्वाचे व मोठे प्रकल्प गुजरातमध्ये कसे येतील याचीही काळजी घेतली गेली होती. त्यामुळे गुजरातचा निकाल भाजपच्या बाजूने लागला म्हणजे देशातील लोकांचा मतप्रवाह एका बाजूने जातो असे म्हणता येणार नाही. दिल्लीतील जनतेने भाजपविरोधात एक होऊन महापालिकेच्या निवडणुकीत ते दाखवून दिले, असे सांगतानाच, भाजपविरुद्ध एक व्हा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी गुजरात निवडणुकीचा निकाल, सीमा प्रश्न, महाविकास आघाडीचा प्रस्तावित मोर्चा आदी विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, गेली 15 वर्षे दिल्ली महानगरपालिकेत भाजपाची सत्ता होती ती आता राहिलेली नाही. हिमाचल प्रदेशात भाजपाचे राज्य होते. तिथे कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. हिमाचल, दिल्लीतील भाजपचे राज्य गेले म्हणजे हळूहळू बदल व्हायला लागला आहे.

राजकारणात पोकळी असते. गुजरातची पोकळी भाजपाने भरून काढली आणि दिल्लीची पोकळी केजरीवाल यांच्या आपने भरून काढली. आज महाराष्ट्रात ती पोकळी आहे, त्या पोकळीला सामोरे जाऊन जनतेला पर्याय द्यायची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, असेही शरद पवार म्हणाले. त्यादृष्टीने कार्यक्रम हाती घेण्यात आले पाहिजेत, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

सीमावादात केंद्राला बघ्याची भूमिका घेता येणार नाही
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत ते म्हणाले की, संसदेच्या अधिवेशनात आज पहिल्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी सीमा प्रश्न उपस्थित केला तेव्हा अध्यक्षांनी हे दोन राज्यांचे भांडण असल्याने संसदेत बोलण्याचा संबंध येत नाही असे सांगितले. दोन राज्यांच्या प्रश्नावर संसदेत बोलायचे नाही तर कुठे बोलायचे, संसद याप्रश्नी लक्ष घालणार नसेल तर कुणी कायदा हातात घेतला तर जबाबदारी कुणाची, असा सवाल करत शरद पवार यांनी, सीमावादात केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेता येणार नाही, असे ठणकावून सांगितले.

महाराष्ट्राची एकता 17 डिसेंबरला दिसेल
17 डिसेंबरला ठरलेला मोर्चाचा कार्यक्रम सर्वपक्षीय आहे. तो सर्वपक्षीय मोर्चा प्रभावीपणे करणे व महाराष्ट्रच नव्हे, तर देशाचा स्वाभिमान जो शिवछत्रपतींची प्रतिष्ठा यासाठी अवघा महाराष्ट्र एकत्र येतो याचे दर्शन या मोर्चाच्या माध्यमातून दिसेल व पुन्हा एकदा चुकीच्या गोष्टी, चुकीचा वापर, राष्ट्रीय नेत्यांना एक प्रकारच्या बदनामीला मदत करणारी भूमिका या राज्यात घेतली जाणार नाही अशी अपेक्षा या मोर्चातून करू, असेही शरद पवार म्हणाले.