राज्य हातात राहिले नाही म्हणून एक मोठा वर्ग अस्वस्थ ; शरद पवार यांचा भाजपला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य आपल्या ताब्यात आले असले तरी दिवस सोपे नाहीत असे सांगतानाच हे राज्य आपल्या हातात राहिले नाही त्यामुळे अस्वस्थता असलेला एक मोठा वर्ग या राज्यात आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला.

आज अमरावतीत राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. देशात सत्ता असल्याने या सत्तेचा वापर करून महाराष्ट्रातील राज्य सरकार संकटात कसं आणता येईल यासाठी अखंड प्रयत्न सुरू आहेत. चौकशा लावल्या जात आहेत, दोन मंत्र्यांना तुरुंगात टाकले आहे. सतत काही ना काही करून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस यांना त्रास कसा देता येईल हा एकमेव कार्यक्रम या राज्यात सुरू आहे. अशा वेळी आपली सामूहिक शक्ती उभी केली तर ही शक्ती हाणून पाडायला वेळ लागणार नाही, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी या वेळी व्यक्त केले.

आज आपल्याला एका वेगळ्या परिस्थितीतून जावं लागत आहे. देशात एक वेगळं जातीयवादी वातावरण निर्माण केलं जात आहे. हिंदू-मुस्लिम करता येईल का? दलित-हिंदू करता येईल का? असं सतत काही ना काही चालू आहे, असाही आरोप शरद पवार यांनी या वेळी केला.

आज सर्वात मोठा प्रश्न महागाईचा आहे. याची झळ सामान्य माणसाला भोगावी लागते आहे. आज पदवीधर होऊनही नोकरी मिळत नाही. या पदवीधरांच्या भवितव्याचा विचार करण्यासाठी देशात सत्ताधारी असलेले मोदी सरकार ढुंकूनही बघत नाहीय. राज्य सरकारच्या भूमिकांना विरोध करायच्या दृष्टीने मोदी सरकार काम करत आहे.