राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणापासून ते आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्या गटाकडून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ अंतर्गत महिलांना वर्गाला आकर्षित करण्यासाठी गुलाबी रंगाचा वापर केला जात असल्याबाबत प्रश्न विचारला. यावर शरद पवार यांनी धम्माल उत्तर दिले.
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार सध्या प्रचारात गुलाबी रंगाचे जॅकेट घालून मिरवत आहेत. जनसभांमध्ये गुलाबी जॅकेट, गुलाबी बॅनर, गुलाबी साडीद्वारे माहोल बनवण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून सुरू आहे. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला.
अजित पवार गुलाबी जॅकेट घालून फिरत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना या रंगाचा फायदा होईल का? विधानसभेला महिला वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होईल का? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना शरद पवार यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच प्रतिप्रश्न केला. तुम्ही निळ्या रंगाचा शर्ट घातल्याने तुमच्याकडे महिला आकर्षित होती का? असा सवाल पवारांनी केला. यावेळी एकच हशा पिकला.
“पिंक जॅकेट घालून गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा…”, अमोल कोल्हेंचा अजितदादांवर हल्लाबोल
आरक्षणावर भूमिका केली स्पष्ट
आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्राने हे धोरण बदललं पाहिजे. केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. केंद्र सरकारने धोरण बदलण्याची भूमिका घेतली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असे शरद पवार म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी. हा प्रश्न मांडण्याच्याबाबत प्रकर्षाने ज्यांनी कष्ट घेतले त्या मनोज जरांगे पाटील यांनाही बैठकीला निमंत्रित करावे. दुसरा मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षणाचा, त्यांचे नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील, त्यांनाही बैठकीला निमंत्रित करावं. त्या संयुक्त बैठकीत आपण चर्चा करुन यामधून मार्ग काढण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.