राजकारण हा फिरता रंगमंच

सामना ऑनलाईन । कोपरगाव

सध्याचे राजकारण हा फिरता रंगमंच झाला आहे. कोणते पात्र कोणत्या वेळी कुठे असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ज्या गावात प्रचाराला जायचे असेल तेथील संबंधित व्यक्ती कुठल्या पक्षात आहे याची खात्री करून घेतो, असा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँगेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत पवार बोलत होते.

पवार म्हणाले, या सरकारच्या काळात शेतमालाला भाव नाही. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, विकास खुंटला आहे. मोदी-शहा ही दुकली देशावर राज्य करीत असून हे सरकार शेतकऱयांचे नसून टाटा-बिर्ला यांच्यासाठी आहे. व्यापारी, कामगार यांच्या उपयोगाचे हे सरकार नसून देशाचा कारभार आपल्या हाती ठेवणे हा ‘एककलमी’ कार्यक्रम सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. सध्याचे राजकारण फिरता रंगमंच आहे. कोणते पात्र कुठे असेल ते सांगता येत नाही. मला ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी जाताना मी पहिले ज्यांच्यासाठी चाललो ते आपल्याबरोबर आहेत की नाही याची चौकशी करून घेतो असे सांगत पवार म्हणाले, रयत संस्था भक्कमपणे उभी असून 40 वर्षे मी कारभार पाहत आहे. काळे-कोल्हे यांना सांभाळून संस्था टिकवणे सोपी गोष्ट नाही. शंकरराव काळे आमचा आधार गेला तर कोल्हे नव्या रस्त्याकडे गेले, असेही ते म्हणाले.

यावेळी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार वैभव पिचड, माजी आमदार अशोकराव काळे, आशुतोष काळे, भानुदास मुरकुटे, पांडुरंग अभंग, अरुण कडू-पाटील, राजेंद्र फाळके, विनायक देशमुख, अनुराधा आदिक, अविनाश आदिक, करण ससाणे, संदीप वर्पे, माधवराव खिलारी, सुनील गंगुले उपस्थित होते. दीपक साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले.