वनडे संघात बुमराहची जागा घेणार मुंबईकर शार्दूल

सामना ऑनलाईन | नवी दिल्ली

टीम इंडियाचा जखमी यॉर्करतज्ज्ञ बुमराहची वनडे चमूतील जागा मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर घेणार आहे. इंग्लंड आणि हिंदुस्थान या बलाढ्य संघांतील ३ सामन्यांची हि मालिका येत्या १२ जुलैपासून इंग्लंडमध्ये खेळवली जाणार आहे. बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने दुखापतग्रस्त बुमराहच्या जागी संघात शार्दुलला स्थान देण्याची घोषणा शुक्रवारी केली.

२४ वर्षीय ”सिमर” बुमराहच्या डाव्या हाताचा अंगठा गेल्या बुधवारी जायबंदी झाला होता. त्याच्या अंगठ्यावर लीड्स येथे यशस्वी शस्त्रक्रिया केल्यावर त्याला मायदेशी पाठवण्यात आले होते.दुखापतीतून बरा होण्यासाठी बुमराहला डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती घ्यायला सांगितले आहे. त्याच्या जागी आता वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला वनडे संघात घेतल्याची घोषणा  बीसीआयचे कार्यवाहू सचिव अमिताभ चौधरी यांनी केली. शार्दूल हा क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या क्रिकेट गुरुकुलात घडला आहे, त्यामुळे मुंबईचा हा पट्ठ्या इंग्लंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळाल्यास चमकदार कामगिरी करू शकेल असा विश्वास त्याचे गुरु लाडसर यांनी व्यक्त केला आहे. हिंदुस्थान -इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना १२ जुलैला नॉटिंगहॅम, दुसरा सामना १४ जुलैला लंडन येथे तर तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना १७ जुलैला लीड्स येथे खेळवला जाणार आहे. यजमान इंग्लड आणि हिंदुस्थान यांच्यातील कसोटी मालिका १ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेतही बुमराह खेळण्याची शक्यता फार कमी आहे.

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेसाठीचा अंतिम हिंदुस्थानी संघ यातून निवडला जाणार आहे.                  हिंदुस्थान -विराट कोहली (कर्णधार),शिखर धवन ,रोहित शर्मा,लोकेश राहुल, श्रेयस अय्यर,सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक) ,दिनेश कार्तिक, कुलदीप यादव,युझवेन्द्र चहल,अक्षर पटेल, भुवनेश्वरकुमार ,शार्दूल पटेल,हार्दिक पंड्या,  सिद्धार्थ कौलआणि उमेश यादव.