शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याच्या आमिष दाखवून व्यावसायिकाची साडे पाच लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना जानेवारी ते जुलै 2022 कालावधीत घडला आहे.

या प्रकरणी इम्रानखान इनामदार (जि. कोल्हापूर) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश भालेराव (वय 36) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

भालेराव हे मंहमदवाडी परिसरात राहण्यास असून, ते व्यावसायिक आहेत. त्यांची एका मित्राच्या मध्यस्थीतून आरोपीसोबत ओळख झाली होती. त्यावेळी आरोपीने त्यांना टाईन एग्रो नावाची कंपनी शेअरमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले.

30 हजारांना 1 लाख 20 हजार आणि 20 हजारांना 60 हजार परतावा देण्याचे कबुल केले. इनामदारने भालेराव यांना 50 हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. शेअर्सची किंमत वाढवून त्याची किंमत 5 लाख 48 हजार रुपये झाली असता पैसे न देता फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस तपास करत आहेत.