
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञ नेहमीच चांगल्या शेअरमध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करा, असे सांगतात. चांगल्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक काही वर्षांनी तेवढाच दमदार परतावा देखील मिळवून देते. याचा प्रत्यय सध्या ऑटोमोबाईल कंपनी आयशर मोटर्सचे (Eicher Motors) शेअर असणाऱ्या गुंतवणूकदारांना येत आहे.
आयशर मोटर्समध्ये 20 वर्षांपूर्वी हजारांमध्ये गुंतवणूक केलेले आता कोट्यधीश झाले आहेत. गेल्या 20 वर्षांमध्ये आयशर मोटर्सने अपेक्षेपेक्षा जास्त परतावा गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे. त्यामुळे आर्थिच क्षेत्रातील तज्ज्ञ मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दीर्घ काळाचा विचार करा आणि चांगल्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा असा मोलाचा सल्ला देतात.
20 वर्षांपूर्वी आयशर कंपनीचा शेअर 2 रुपये 43 पैशांना मिळत होता. आज या शेअरची किंमत 2 हजार 731 रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या 2 दशकांमध्ये या शेअरने 1 लाख 12 हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 20 वर्षापासून या शेअरने मागे वळून पाहिलेले नाही. परताव्यासह कंपनीने भरभक्कम डिव्हिडंड देखील दिलेला आपल्याला दिसतो.
झुनझुनवाला यांचा पोर्टफोलियो पहिल्यांदाच जगजाहीर, वाचा कोणत्या कंपनीचे किती शेअर आहेत
पहिल्या लाटेत होती गुंतवणुकीची संधी
गेल्या वर्षी कोरोनाची पहिला लाट आल्यानंतर शेअर मार्केट कोसळला होता. या काळात आयशर मोटर्सचा शेअर देखील 1250 रुपयांपर्यंत खाली आला होता. अर्थात स्थिती सुधारल्यानंतर वर्षभरातच हा शेअर 115 टक्क्यांनी वाढल्याचे दिसले. तर गेल्या 10 वर्षांचा विचार केल्यास हा शेअर 174 रुपयांवरुन 2731 रुपयांवर पोहोचल्याचे दिसते.
10 हजारांचे कोटी
या हिशोबाने पाहिले तर 10 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 10 हजारांची गुंतवणूक करणाऱ्याचे आता 1 लाख 56 हजार रुपये झाले आहेत. तर 20 वर्षांपूर्वी ज्याने 10 हजार गुंतवले असतील त्याचे 1 कोटीहून अधिक झाले असतील.




























































