मालवाहतुकीसाठी शारजाह- जेएनपीटी-शारजाह नवीन मार्गाची सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकुमार भगत । न्हावाशेवा

हिंदुस्थानचा आणि पर्यायाने जेएनपीटीचा परदेश व्यापार वाढावा यासाठी आत्ता संयुक्त अरब अमीरात (यूएई) व हिंदुस्थान समुद्री मार्गावर आता शारजाह कंटेनर टर्मिनल-जेएनपीटी-कांडला- जेएनपीटी असा नवीन सागरी मार्ग सुरू करण्यात आला आहे. सन मरीन शिपिंग सर्व्हिसच्या एम व्ही पोर्ट क्लागं या मालवाहू जहाजाने शारजाह कंटेनर टर्मिनल ते जेएनपीटी असा पहिला प्रवास केला. हे मालवाहू जहाज रविवार 17 ला जेएनपीटीला पोहचले

हे मालवाहू जहाज शारजाहच्या पोर्ट खालिद ते जेएनपीटी व हिंदुस्थानच्या पश्चिम भागातील इतर बंदरांना जलद आणि थेट सेवा देणार असून ही सेवा हिंदुस्थानचे शेवटचे बंदर ते शारजाह 3 दिवसात पूर्ण करणार आहे. जगभरातील अव्वल असलेल्या ३० कंटेनर बंदरामध्ये जेएनपीटी एकमेव हिंदुस्थानीय बंदर आहे. या बंदराच्या परिवर्तनाच्या पुढील टप्प्यासाठी आवश्यक असणारी कार्यक्षमता वाढविण्यासाठी नव नविन उपाय योजना जेएनपीटीकडून राबविण्यात येत आहेत. नेव्हिगेशनल चॅनेलची खोली वाढविण्यात येत असून 15 मीटर पर्यंतचे ड्रेजिंग पूर्ण झाले आहे त्यामुळ 12 हजार 500 टीयूई पेक्षा जास्त मालवाहतूक करणारी जहाजे हाताळता येणार आहेत.

या नवीन सेवेविषयी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले की, “जेएनपीटी हिंदुस्थानतील नंबर एकचे बंदर असून त्याची कार्यक्षमता अधिक नाविन्यपूर्ण व सुधारण्यासाठी तसेच व्यापारात वाढ करण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करीत आहे. आम्ही आयात निर्यात दारांना सुलभ ग्राहक सेवा देण्यासाठी कटीबद्ध आहोत. संयुक्त अरब अमीरात (यूएई) आपले बंदर विकसित करीत आहे आणि आशिया, आफ्रिका आणि युरोपमधील त्याच्या सुयोग्यरीत्या जोडल्या गेल्यामूळे जागतिक व्यापारासाठी प्रमुख स्थान बनत आहे. त्यामुळे दोन्ही देशातील समुद्री व्यापार संबंध आशियातील मेरीटाईम क्षेत्राचा विकास करण्यास मदत करतील तसेच जागतिक बाजारपेठेच्या वाढीसाठी नवीन मार्ग सुरु होईल.”