
दहिसरमधील पालिकेच्या वॉर्ड क्र. १ मध्ये निवडून आलेल्या शिंदे गटाच्या नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशनकार्ड, दोन राज्यांतील मतदान ओळखपत्रे असून त्यांनी पालिकेचे घर मिळवण्यासाठी खोटे शपथपत्र वापरल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आज केला.
रेखा यादव यांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याची सर्व डिटेल्स माहिती अधिकार कायद्यात मिळाल्याचे सांगत त्यांनी बोगस कागदपत्रेच पालिका मुख्यालयातील पत्रकार परिषदेत झळकाविली. रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड आहेत. रेशन कार्ड क्रमांक ३९३२०४ जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सादर करण्यात आले. तर रेशन कार्ड क्रमांक ४८२९९७ जात पडताळणी समितीसमोर सादर करण्यात आले. कायद्यानुसार एका कुटुंबाला एकच रेशन कार्ड असू शकते. मात्र त्यांनी दोन वेगवेगळी रेशन कार्डे मिळवून त्यांचा वापर विविध शासकीय यंत्रणांसमोर करून जातआधारित लाभ मिळविल्याचा आरोप यावेळी शीतल म्हात्रे यांनी केला.
जौनपूर, उत्तर प्रदेशमधील तीन मतदार ओळखपत्रे
रेखा यादव यांच्याकडे दोन राज्यांमध्ये तीन मतदार ओळखपत्रे आहेत. यामध्ये एक्सडब्ल्यूसी ४८१०२६३, एक्सडब्लूसी ९०२६६१८ ही दोन बोरिवली विधानसभा मतदारसंघातील तर बीकेएसएफबीयू ७२८ हे जौनपूर, उत्तर प्रदेशमधील मतदार यादीनुसार असल्याचेही त्या म्हणाल्या.























































