मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक चर्चेचे आश्वासन शिर्डी बंद मागे

966

साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादातून शिर्डी ग्रामस्थांनी पुकारलेला बेमुदत बंद आज मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रश्नी सकारात्मक चर्चेचे आश्वासन दिल्यानंतर शिर्डीकरांनी ग्रामसभेत बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उद्या मुंबईत शिर्डी व पाथरीकरांची बैठक बोलावली आहे.
साईबाबांच्या जन्मस्थळावरून शिर्डी विरुद्ध पाथरी असा वाद सुरू झाला आहे. शिर्डी ग्रामस्थांनी आजपासून बेमुदत बंदची हाक दिली होती. त्याप्रमाणे शनिवारी मध्यरात्री 12 पासून बंदला सुरुवात झाली. एरवी 24 तास सुरू राहणारी साईंची शिर्डी आज पहिल्यांदाच दिवसभर कडकडीत बंद होती. सायंकाळी पुन्हा एकदा ग्रामसभा झाली आणि रविवार मध्यरात्री 12 नंतर बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक चर्चेचे आश्वासन दिल्यामुळे हा बंद मागे घेण्यात येत असल्याचे ग्रामसभेने सांगितले. दरम्यान, उद्याच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असेही ग्रामसभेत ठरविण्यात आले.

बंदमुळे भक्तांचे हाल

शिर्डी बंद होती, पण भक्तांचा ओघ थांबला नव्हता. शिर्डीत साईभक्तांची प्रचंड गर्दी होती, पण बंदमुळे त्यांचे हाल झाले. खासगी प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे एसटी प्रशासनाला जादा गाडय़ा सोडाव्या लागल्या. सर्व दुकाने बंद असल्याने भक्तांना हार-फुले आणि प्रसादाविनाच साईंचे दर्शन घ्यावे लागले.

सुरक्षा व्यवस्थेत वाढ

यावेळी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या वतीने आर.सी.पी.च्या दोन तुकडय़ा, स्ट्रायकिंग फोर्सची एक तुकडी, उपविभागीय कार्यालयातील लोणी, कोपरगाव येथील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यासह 150 पोलीस व 12 अधिकारी यांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात होता.

संस्थानच्या वतीने 80 हजार भाविकांच्या भोजनाची व्यवस्था

बंदमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून संस्थानने पूर्ण तयारी केली होती. रात्री 1 वाजल्यापासून नाश्ता पाकिटांची तयारी सुरू केली होती. सकाळी 9 वाजेपर्यंत 23 हजार नाश्ता पाकिटांची विक्री संस्थानने मंदिर परिसर, भक्त निवास, प्रसादालय व द्वारावती या परिसरात केली, तर रोज 10 वाजता सुरू होणारे प्रसादालय आज सकाळी 9 वाजताच सुरू केले. दिवसभरात 80 हजार भाविक जेवण घेऊ शकतील याचे नियोजन त्यांनी केले. रात्री 11.30 पर्यंत याची वेळ वाढवली. भक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी संस्थान प्रशासनाने घेतली.

शिर्डीत परिक्रमा रॅली

रविवारी सकाळी द्वारकामाईसमोर सर्वधर्म सद्भावना परिक्रमा रॅली काढण्यात आली. या रॅलीत शिर्डी आणि आसपासच्या गावांतील शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. साईंची आरती आणि साईनामाच्या अखंड जयघोषाने द्वारकामाई परिसर दणाणून गेला होता. या रॅलीत शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष अर्चना काते हेसुद्धा सहभागी झाले होते.

परभणीत साई जागर

पाथरीतील साईभक्तांनी रविवारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साईजागर आंदोलन केले. या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच असल्याचे भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत. तरीही विनाकारण वाद निर्माण करून पाथरीच्या विकासात खोडा घातला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केला आहे. उद्याच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही 29 पुरावे मांडणार आहोत, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या