बनावट संस्थांविरोधात शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री साईबाबा संस्थानच्या नावाखाली साईभक्तांची फसवणूक करणाऱया बनावट संस्थेच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून भाविकांकडे डोनेशन मागितल्याच्या तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

साईदर्शनासाठी देश-विदेशांतून मोठय़ा प्रमाणावर साईभक्त येत असतात. साईंची ख्याती जगभर असल्याने कोटय़वधी साईभक्त संस्थानची माहिती वेगवेगळ्या माध्यमांतून शोधत असतात. काही दिवसांपासून साईभक्तांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी साईबाबा संस्थानकडे आल्या होत्या. बनावट संस्था फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंट या माध्यमांतून ‘साईबाबा संस्थान, शिर्डी’ यांच्या नावाने डोनेशन मागत असल्याबाबतची माहिती मिळाली होती. त्याबरोबरच साईसमाधीचे विनापरवाना लाइव्ह दर्शन दाखवितात, असेदेखील निदर्शनास आले होते. साई संस्थानच्या तदर्थ समितीपुढे हा विषय चर्चेसाठी आला होता. अशा प्रकारे भक्तांची फसवणूक करणाऱया कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय तदर्थ समितीने घेतला होता.

आयटी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनीही कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. आयटी विभागाच्या कर्मचाऱयांनी अशा बनावट संस्थांचा शोध घेतला असता, बनावट संस्था इन्स्टाग्राम व फेसबुक अकाऊंटवरून लाइव्ह दर्शन देऊन बदनामी करणाऱया वेबसाइट्स आढळल्या. त्याबरोबरच साईबाबा संस्थानच्या नावाने देणगी मागणाऱया संस्थादेखील निदर्शनास आल्या. अशा वेबसाइट्स, यू टय़ूब अकाऊंट, फेसबुक अकाऊंटवर साईबाबांची बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध केल्याचेदेखील दिसून आले. त्याबरोबरच साईबाबा संस्थानने केवळ ‘टाटा स्काय’ला लाइव्ह दर्शन दाखविण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र, साईबाबा समाधिमंदिरातील दर्शन दाखविणाऱया संस्थांवर शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.