
सामना प्रतिनिधी। शिर्डी
नगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडल्यास पक्षाचा एक खासदार वाढेल म्हणून मी जिवाचे रान करीत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मात्र सुजयने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढावे असा सल्ला देत होते, असा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँगेसकडून लोकसभेची निवडणूक लढणे ही राजकीय आत्महत्या ठरली असती, असेही विखे यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारल्यानंतर शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे-पाटील यांनी मनातील सल बोलून दाखविली. ते म्हणाले, ‘जिंकून येण्याची क्षमता असलेला उमेदवार’ या निकषावर लोकसभेचे जागावाटप करण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीने ठरवले होते. त्यानुसार नगर लोकसभा मतदारसंघाची आजची परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा डॉ. सुजय विखे यांच्यासाठी काँग्रेसला द्यायला हवी होती. सुजयने मागील 3-4 वर्षांपासून येथे उत्तम बांधणी केली होती; पण राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक ही जागा सोडली नाही. त्यासाठी काँग्रेसमधील काही नेतेही राष्ट्रवादीला सामील झाले होते. तरीदेखील ही जागा काँग्रेसला सोडावी म्हणून मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले.
कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेणार
या सर्व घडामोडींत आमचे कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. निवडणूक संपली की मी त्यांच्याशी चर्चा करून मी पुढील निर्णय घेणार असल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. पुढील काळासाठी आपण पाण्याच्या प्रश्नावर अधिक काम करणार आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे आणून उत्तर महाराष्ट्र, खान्देश व मराठवाडय़ाची तहान भागवायची, हे डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही विखे-पाटील म्हणाले.

































































