मोठय़ांच्या छोटय़ा गोष्टी – 19

>> शिरीष कणेकर

झाले बहु, होतील बहु, परि यासम हा. जसा चार्ली चॅपलिन एकच झाला तसा सर डॉन ब्रॅडमनही एकच झाला. एकमेवद्वितीय. त्याच्या स्पर्धेतही कोणी येत नाही. कोणीसं म्हटलंय की ब्रॅडमन संघात असेल तर वाईटात वाईट स्वप्न तुम्हाला पडलं तरी हरल्याचं स्वप्न कधी पडणार नाही. ब्रॅडमनला बाद केल्यावर बिल बोज या गोलंदाजानं चक्क लेख लिहिला होता. ‘हाऊआय बोल्ड ब्रॅडमन फॉर अ डक।’ जणू हिटलरलाच मारला होता…
नाव – सर डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन
जन्म – 27 ऑगस्ट 1908
मृत्यू – 25 फेब्रुवारी 2001
आयुष्यमान – 92 वर्षे, 182 दिवस
उंची – 5 फूट 7 इंच
कसोटी सामने – 52 कसोटी, 80 खेळय़ा, 6969 धावा, 29 शतके, सरासरी 99.94.
प्रथम दर्जाचे सामने – 234 सामने, 28067 धावा, सरासरी 95.01.
कसोटीत दोन त्रिशतके व सात द्विशतके
जागतिक युद्धापायी 1940 ते 1946 ही वर्षे वाया गेली.
कसोटी कारकीर्दीत केवळ सहा षटकार पण 618 चौकार.
6 जानेवारी 1930 रोजी न्यू साऊथ वेल्सतर्फे क्विन्सलंडविरुद्ध खेळताना शेफिल्ड शील्ड सामन्यात ब्रॅडमनने नाबाद 452 धावा ठोकल्या.
ब्रॅडमननं एका सामन्यात 22 चेंडूत शतक ठोकले.
अनेकदा तो बॅटऐवजी स्टंपनं सराव करायचा.

1948 साली आपला संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर गेला होता तेव्हा एका कसोटीत ब्रॅडमननं विनू मंकडवर हल्ला चढवला. त्याला अशा वागणुकीची सवय नव्हती. त्याचा चेहरा पडलेला पाहून ‘नॉन-स्ट्रायकर’ किथ मिलर मंकडला म्हणाला, ‘तू मनाला लावून घेऊ नकोस. तो कोणालाही असाच मारतो.’
एका सामन्यात ब्रॅडमन यष्टीरक्षक सेनला विचारायचा, ‘सांग, पुढला चेंडू कुठे मारू?’
सेन सांगायचा, हा मारायचा. थोडय़ा वेळानं ब्रॅडमन सेनला म्हणाला, ‘आता तू सांगू नकोस, तुझी एकाग्रता ढळेल.’
तुझी एकाग्रता? याचं काय?
एका सामन्यात खंडू रांगणेकर पॅव्हेलियनमध्ये बसला होता. ब्रॅडमन खेळायला आला आणि खंडूनं पाहिलं की, एक स्त्र्ााr गळय़ातला क्रॉस हातात घेऊन देवाचं नाव घेत्येय. ती कमालीची टेन्शनमध्ये होती. थोडय़ा वेळानं ती रिलॅक्स झाली.
‘त्याच्या पहिल्या काही धावा निघेपर्यंत मी नेहमीच अशी टेन्स असते.’ तिनं स्वतःहून खंडूला माहिती पुरवली.
‘कोण तुम्ही?’
‘मी मिसेस ब्रॅडमन.’
‘अहो, तुम्ही मिसेस ब्रॅडमन आहात तर तुम्हाला एवढं टेन्शन येतं; तुम्ही मिसेस रांगणेकर असतात तर तुमचं काय झालं असतं?
प्रलयंकारी इंग्लिश गोलंदाज हॅरॉल्ड लारवुड यानं त्याच्या ‘लारवुड स्टोरी’ या आत्मचरित्रात लिहून ठेवलंय, ‘तो (ब्रॅडमन) जेवढा जोरात मारायचा तेवढा मी जास्त जोरात टाकायचो व मी जेवढा जास्त जोरात टाकायचो तेवढा तो जास्त जोरात मारायचा.’
‘ब्रॅडमनची विकेट काढलीस तर मी तुझ्याशी लग्न करीन’ अशी अट लेग स्पिनर वॉस्टर रॉबिन्सला त्याच्या प्रेयसीनं घातली होती. रॉबिन्सनं अट पूर्ण केली. रॉबिन्सची प्रेमनौका किनाऱयाला याचा आनंद मानावा की विकेट गमावल्याचं दुःख मानावं हेच ब्रॅडमनला कळेना.
‘वर्ल्ड टीम’ला ‘रिसिव्ह’ करायला ब्रॅडमन एअरपोर्टवर गेला होता. तेव्हा सोबर्सकडे बोट दाखवीत ब्रॅडमन गावसकरला म्हणाला, ‘दे हॅव पॉवर, वी हॅव फुटवर्क!’
ब्रॅडमन सर्वश्रेष्ठ होता ही गोष्ट निर्विवादपणे सिद्ध करायला एक बिनतोड पुरावा उपलब्ध आहे. ब्रॅडमनच्या आधी व नंतर असा एकही फलंदाज झाला नाही की ज्याला नमवण्यासाठी ‘बॉडीलाइन’सारखा अनैतिक, बेकायदेशीर मार्ग प्रतिपक्षाला अवलंबावा लागला. दुसऱया कुठल्याही फलंदाजानं प्रतिपक्षाला एवढं हतबल केलेलं नाही. सर नेव्हिल कार्डस तिला ‘हेडलाइन’ म्हणतो. जुना ऑस्ट्रेलियन फलंदाज जो डार्लिंग तिला ‘ब्रॅडमनलाइन’ म्हणतो.
मुसोलिनीचा पाडाव झाला असला तरी हिटलरचा थैमान चालूच आहे हे सांगताना दृष्टांत देत एक सदस्य ब्रिटिश पार्लमेंटमध्ये म्हणाला, ‘वी हॅव गॉट पॉन्सफोर्ड आऊट, बट ब्रॅडमन इन स्टिल बॅटींग।’ ‘आम्हाला वाटायचं की मॉरिस व बार्न्स ही ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी फुटूच नये कारण त्यातलं कोणी आऊट झालं की हा आला. तू नको रे बाबा’. इति अष्टपैलू खेळाडू रंगा सोहोनी.
ब्रॅडमननं केवळ एक चौकार जास्त मारला असता तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याची धावांची सरासरी शंभर झाली असती. म्हणजे गेला खेळायला की शतक! है कोई माईका लाल ऐसा?…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या