शिरीषायन : मोठ्यांच्या छोट्या गोष्टी : 25

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

ज्यांचं मला अपरंपार कौतुक आहे, ज्यांच्या चरणी मी लीन आहे, ज्यांचा मी परमभक्त आहे त्यांची कधी न कधी प्रत्यक्ष भेट व्हायलाच हवी असा काही नियम नाही. त्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. काही योग आयुष्यात असतात, काही नसतात. जयवंत दळवींना भेटण्याचा योग होता, पण पु.लं.ना भेटण्याचा नव्हता. राज कपूर व देव आनंदना भेटलो, पण दिलीपकुमारला नाही भेटू शकलो. तलतला भेटलो, पण रफीला नाही भेटू शकलो. अनिल विश्वास, सी. रामचंद्र, नौशाद, जयदेव, सज्जाद, ओ. पी. नय्यर यांना भेटलो, पण शंकर-जयकिशन, हंसराज बहेल, हुस्नलाल-भगतराम, रोशन, वसंत देसाई, मदन मोहन, नौशाद, एन. दत्ता, बुलो सी. राणी, एस. डी. बर्मन, खय्याम, एस. मोहिंदर, विनोद, चित्रगुप्त यांना नाही भेटू शकलो. मी व. पु. काळे, ना. सी. फडके, शं. ना. नवरे, नारायण धारप, सुरेश खरे, रत्नाकर मतकरी यांना भेटलो, पण वि. स. खांडेकर, विंदा करंदीकर, ग. दि. माडगुळकर, दि. बा. मोकाशी, मधु मंगेश कर्णिक यांना नाही भेटू शकलो, पण एका गोष्टीची मला जरा जास्तच बोचणी आहे. मी ‘गजल किंग’ सुरेश भटांना भेटलो नाही, भेटू शकलो नाही.

भट हे त्यांच्या हयातीतच अरण्यायिका बनून राहिले होते. त्यांच्याविषयी नाना किस्से, कहाण्या पसरल्या होत्या किंवा हितशत्रूंनी त्या हेतुपुरस्सर पसरवल्या होत्या. भटांचा सगळ्यात मोठा अपराध म्हणजे त्यांच्या लेखनाविष्काराला अभूतपूर्व लोकाश्रय मिळाला होता. त्यांच्या खवैय्येगिरीचे खरेखोटे किस्से चघळून चघळून सांगितले जात.

त्यानंतर सुरेश भट एकदा ‘लोकप्रभे’त कशाला तरी आले होते. गोल्ड स्पॉट पिता पिता ते गरजले ‘तो कणेकर कुठाय रे?’

माणसं धावली. मी ‘इंडियन एक्प्रेस’मधल्या माझ्या खात्यात नव्हतो. (सुदैवानं) मी रिपोर्टिंगसाठी बाहेर गेलो होतो, पण मी समजा असतो तर भटांनी माझ्या पाठीत सणसणीत वऱ्हाडी बुक्का मारला असता का? असता बाबा, असता. मग मी म्हणालो असतो –
पाठीत भटानं मारला माझ्या गुद्दा

त्यावर काय राहिला असता नवा मुद्दा

सुरेश भट प्रत्यक्षात एवढंच म्हणाले, ‘सांगा त्या कणेकरला, म्हणावं मी फक्त खात नाही तर कोल्ड ड्रिंकही पितो!
ऐकणाऱ्यांनी भटांची उक्ती माझ्यापर्यंत अचूक पोहोचती केली. आपलं नाव भटांना माहित्येय व लक्षातही आहे याचंच त्या वेळी मला धन्य वाटलं होतं. कुठे इंद्राचा ऐरावत कुठे शामभटाची तट्टाणी! टर उडवायला काय लागतंय, ‘ओरिजिनल’ लिहून दाखवा…
भटांचा मिश्किलपणा पाहा. ते लिहितात,
तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता
गडे ऐकून घे माझा इरादा चांगला होता

पुण्याचे प्रदीप निफाडकर भटांचे शिष्य, अनुयायी व मित्र होते. एकदा दोघं रिक्षातून कामाला निघाले होते. वाटेत भटांना शेर सुचला. त्यांनी ताबडतोब रिक्षा परत फिरवली. त्या शेरावर त्यांना गजल लिहायची होती. लेखनापुढे बाकी सगळं गौण होतं. त्यांना रिक्षात अचानक सुचलेला शेर होता –
जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती
सारखी तेजाळणारी ओल एखादीच होती

आपल्या सगळ्यांच्या काळजाच्या जिव्हारी लागणारे ओजस्वी शब्द त्यांच्या लेखणीतून सहज उतरत. प्रत्येकालाच वाटायचं की, भटांनी माझं दुःख मांडलंय, माझी खपली उचकटल्येय. भटांना कसं कळतं माझं दुःख? मी तर ते कडीकुलुपात लपवून ठेवलं होतं. बघा, भट काय म्हणतात –
जन्मभर अश्रूस माझ्या
शिकवले नाना बहाणे
सोंग पण फसण्या जिण्याचं
शेवटी शिकलोच नाही

अन् हा एक शेर वाचा –

सारखे माझ्या स्मितांचे
हुंदके संभाळले मी
एकदा हसलो जरासा मग
पुन्हा हसलोच नाही

‘इतकेच मला जाताना’ ही भटांची सर्वोत्कृष्ट गजल असू शकेल. ‘मी सिंधूताई सकपाळ’ या चित्रपटात तिचा समावेश करण्यात आला होता. अशोक पत्कींची अप्रतिम चाल देवकी पंडितनं सुरेख गायल्येय. वाचा –
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते…
ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते…
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूत मिसळले होते…
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते…
मी एकटाच त्या रात्री आशेनं तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते…
[email protected]