
>> शिरीष कणेकर
मला खूपच अपराधी वाटत होतं. फार दिवसांत (हे वर्षात असं वाचावं) मी सुनील मनोहर गावसकरशी संपर्क साधला नव्हता. उगीच फोन करून त्रास देणं व त्याच्या घरी किंवा ऑफिसात जाऊन चकाट्या पिटत बसणं मला बरोबर वाटत नाही. मी रिकामटेकडा असलो तरी तो आहे का? शिवाय त्याला स्वतःचे असे मिलिंद रेगेसारखे मित्र होतेच की, ‘ए, मी पण तुमच्यातलाच रे, असं म्हणत घुसखोरी करण्याचा माझा स्वभाव नाही. बोलता बोलता ‘आपला यार, सनी’ अशी पुडी सोडून उसना मोठेपणा आणणं माझ्या रक्तात नाही. मुद्दा काय, सुनील गावसकरकडे जाणं येणं नव्हतं. बोलणं-चालणं नव्हतं.
पण आता त्याच्याशी संपर्क साधणं अनिवार्य झालं होतं. माझा षष्ठय़ब्धपूर्ती सोहळा होता. मंचावर तत्कालिन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, राजेश खन्ना, प्रभूती असणार होते. मला सुनील गावसकर हवा होता. त्याच्या उपस्थितीत कार्यक्रमाला चार चाँद लागले असते. ‘क्रिकेट-वेध’ या माझ्या (नवसाच्या) पहिल्या पुस्तकाला त्याची रसिली प्रस्तावना लाभली होती. (त्याच्या हस्ताक्षरातील प्रस्तावना मी अजून जपून ठेवल्येय. लता मंगेशकरनं माझ्या ‘यादों की बारात’ला लिहिलेली प्रदीर्घ प्रस्तावना मी अशीच उरापोटी जपून ठेवली आहे.) सुनील माझ्या सोहळय़ाला ‘मस्ट’ आहे, असं माझ्या मनानं घेतलं होतं.
मी त्याला फोन लावला.
‘काय म्हणतो बोल’ पलीकडून तत्काळ जवाब आला. तो ओळखेल का, ओळखलं तरी ओळख दाखवेल का, या मनाला सतावणाऱया प्रश्नांची जळमटं क्षणार्धात नाहीशी झाली.
मी त्याला फोनचं कारण सांगितलं.
‘आयला, साठ वर्षांचा झालास घोडय़ा!’ तो उसळून उत्तेजित होत म्हणाला, घोडय़ाच्या पुढे त्यानं दोनचार जालिम शिव्याही हासडल्या.
मला भरून आलं. एवढी जवळीक तो अजूनही राखून होता. तर मी उगाचच घाबरत होतो. त्याच्या चांगुलपणाची मी मनोमन नोंद घेतली.
प्रत्यक्ष कार्यक्रमात त्याचं छोटेखानी भाषण सर्वात मस्त झालं. प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. त्याच्या हातात बॅट असती तर ती हलवून त्यानं मानवंदना स्वीकारली असती. भाषणात तो म्हणाला, ‘शिरीष, आज साठ झालास. शतक गाठायचंच हे विसरायचं नाही. असाच खेळत राहिलास तर शतक कुठं गेलं नाही. स्ट्रेट बॅटीनं खेळ. मध्येच वेडंवाकडं काही करायचं नाही. अशानं डीप फाडून लेगला कॅच जातो. मी साठीबद्दल तुझं अभीष्टचिंतन करतो व शतकसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. शतक झळकवलंस की आपण दोघं मिळून स्टेडियमला राऊंड मारू…’
माझ्या पंचाहत्तरीच्या जंगी सोहळय़ाला मला त्याची अनुपस्थिती जाणवली. (तो देशाबाहेर होता.) तो असता तर म्हणाला असता, ‘शिरीष, आता फक्त पंचवीस राहिले. कम ऑन, कॉन्संट्रेट, क्रँप वगैरे येणारच. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. रन्स धावण्यात हलगर्जीपणा नको. कम ऑन, पिपल आर ऑलरेडी क्लॅपिंग…’
आज माझ्या पुस्तकांची संख्या पन्नासच्या घरात पोहोचली असली तर त्याचं श्रेय माझ्या पहिल्या पुस्तकाला सुनीलने लिहिलेल्या प्रस्तावनेला जातं. शतकाबद्दल सल्ला द्यायला सुनीलहून लायक कोण असू शकतं?
त्या काळात मी त्याला घरी जेवायला बोलावलं होतं. प्रेम, आपुलकी, कृतज्ञता या भावना व्यक्त करण्याची माझी पद्धत म्हणजे त्या व्यक्तीला जेवणाचं अवताण देणं. (याचाच अर्थ मी ज्यांना आजवर जेवायला बोलावलेलं नाही त्यांनी काय ते समजून घ्यावं!) तो दिलेल्या वेळेला अचूक आला. आधी मी त्या विंगेत गेलो, असल्या काही सबबी नाहीत.
तो आल्या आल्या माझ्या छोट्या मुलानं हातातली प्लॅस्टिकची बॅट उगारत त्याला विचारलं, ‘मारू तुला?’ ‘नको-नको’ सुनील घाबरल्यासारखं दाखवत म्हणाला, ‘अजून थोडे दिवस खेळावं म्हणतोय.’
भरलेलं ताट बघून तो म्हणाला, ‘हे सगळं एकनाथ सोलकर साफ करील. मी एवढं जेवत नाही रे बाबा.’
‘मी एवढय़ा रन्स काढत नाही रे बाबा’ असं तू कधी म्हणतोयस याची प्रतिपक्षाचे गोलंदाज वाट पाहतायत’ मी म्हणालो.
सुनील वर्ल्ड टीमतर्फे खेळायला ऑस्ट्रेलियात गेला तेव्हा विमानतळावर त्यांना ‘रिसिव्ह’ करायला खुद्द डॉन ब्रॅडमन आला होता. संघातील उंच, तगडय़ा खेळाडूंकडे अंगुलीनिर्देश करीत डॉन सुनीलला म्हणाला, ‘दे हॅव पॉवर, वी हॅव टायमिंग!’
म्हणूनच डॉन ब्रॅडमनचा एकेक शब्द सोन्याच्या तागडीत तोलला जायचा. आपला विक्रमी सलामीवीर त्या तागडीतून तोलून, तावून, सुलाखून, निःष्कलंक बाहेर पडला. ब्रॅडमनच्या घरी जाऊ शकलेला तो पहिला क्रिकेटपटू होता. दुसरा तेंडुलकर. ‘खूपसा तुझ्यासारखा खेळतो’ असे ब्रॅडमनची बायको सचिन तेंडुलकरला खेळताना टी.व्ही.वर पाहून ब्रॅडमनला म्हणाली होती.




























































