शिवजयंती उत्साहात साजरी होणार, कोरोनाचे नियम पाळावेच लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivaji-maharaj-1

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती आज महाराष्ट्रासह देशभरात साजरी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे यंदा जल्लोष करता येणार नसला तरी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे. गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन शिवरायांचे अद्वितीय कार्य आणि पराक्रमांच्या स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे.

प्रभात फेऱया, बाईक रॅली, मिरवणुका न काढता शिवजयंती पारंपरिक उत्साहात साजरी केली जाणार आहे. अनेक ठिकाणी शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे, आरोग्यविषयक उपक्रम तसेच स्वच्छता जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. अनेक ठिकाणी पोवाडे, नाटके यांचे ऑनलाईन प्रक्षेपण केले जाणार आहे.

n कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शिवजयंती उत्सवासाठी 100 जणांच्या उपस्थितीचीही परवानगी सरकारने दिली आहे. त्या मर्यादेचे पालन करून उद्याचा शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरीवर

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी सव्वानऊ वाजता शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत. शिवनेरीवर जाऊन मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांना अभिवादन करतील. शिवनेरीचे संवर्धन, सुशोभिकरण व पर्यटनदृष्टय़ा विकास करण्यासाठी राज्य सरकारने अलीकडेच 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपत पर्यटनदृष्टय़ा विकास केला जाणार आहे.