
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य बजेट सन 2021-22 अंतर्गत 3 कोटी 60 लाख रु. मंजूर केलेल्या रस्त्याचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते डिगस येथे भूमिपूजन करत असताना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी धुडगूस घालत शिवसैनिकांना धक्काबुक्की केली. या गुंडशाही प्रवृत्तीचा डिगस शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने सोमवारी डिगस (ता. कुडाळ) येथे निषेध करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी दिली.
बजेट अंतर्गत आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ विधानसभ मतदारसंघात 18 कोटींचा विकास निधी मंजूर झाला असून या विकास कामांची भूमिपूजने आम्हीच करणार आहोत. जर यापुढे कोणाला विकासकामांची भूमिपूजने अडवायची असतील तर अडवून दाखवावीत. यापुढे अशाप्रकारे भूमिपूजने अडवायचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी यावेळी बोलताना दिला.
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या मठ – कुडाळ – पणदूर – हुमरमळा – जांभवडे घोटगे या रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यास शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला होता. यानंतर सोमवारी सायंकाळी डिगस येथे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांच्या नेतृत्वाखाली डिगस मधील शिवसैनिकांनी एकवटत भाजपच्या कार्यकर्त्यांनी भूमिपूजन करण्यास विरोध तसेच धक्काबुक्की केल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसा फलकही शिवसैनिकांकडून लावण्यात आला आहे.






























































