
राजेश देशमाने । बुलढाणा
सिंदखेडराजा, लोणार नगरपरिषदेच्या रविवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी करण्यात आली. सिंदखेडराजा येथे शिवसेना-भाजप युतीने नगराध्यक्षासह आठ जागी विजय मिळविला. तर राष्ट्रवादी-काँग्रेसला आठ जागा व एक अपक्ष उमेदवार निवडून आला. लोणार नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसने नगराध्यक्षसह दहा जागी विजय मिळविला तर शिवसेनेला सात जागी विजय प्राप्त झाला आहे.

सिंदखेडराजा नगर परिषदेची निवडणूक होऊन मतमोजणी सोमवारी सकाळी पार पडली. पहिल्या फेरीपासून शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सतिश भागोजी तायडे यांनी आघाडी घेत 5652 मते घेत तब्बल 1298 मतांनी निवडून आले. तर नगरसेवक पदासाठी शिवसेना-भाजप युतीचे 8, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे 8 व अपक्ष 1 ठिकाणी विजयी होऊन मागील निवडणुकीचीच पुनरावृत्ती मातृतिर्थात या निवडणुकीत पहावयास मिळत आहे.
शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सतिश भागोजी तायडे हे 5652 मते घेत विजयी झाले आहेत, काँग्रेस राष्ट्रवादीचे देविदास वसंतराव ठाकरे यांना 4354 मते मिळाली आहेत. बहुजन वंचीत आघाडीचे सुधाकर संतुराम चौधरी यांना 988 मतावरच समाधान मानावे. 109 मतदारांनी नोटाला मतदान केले.
सिंदखेडराजा नगर परिषदेच्या निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीत या मातृतिर्थातील जनतेने भाजप-शिवसेनेला 8 तर एक अपक्ष व काँग्रेस राष्ट्रवादीला 8 अशा जागा मिळून भाजप सेनेने बहुमत प्राप्त करत नगर परिषदेवर भगवा फडकवला होता. याची पुनरावृत्ती या निवडणुकीदरम्यान दिसून आली आहे. त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे दुसर्यांदा भाजप सेनेला संधी मिळाली आहे.



























































