
सामना प्रतिनिधी । नाशिक
राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी सेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी जिह्यातील प्रत्येक तालुक्यात व्हावी, या मागणीचे निवेदन शुक्रवारी शिवसेना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी एस.टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांना दिले.
भीषण दुष्काळाची तीव्रता व शेतकऱ्यांवर आलेले आर्थिक संकट हे लक्षात घेवून शासनाने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी बससेवा देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी नाशिक जिह्यात ठराविक ठिकाणी होते, अनेक ठिकाणी या सेवेचा लाभ मिळत नसल्याने विद्यार्थी या सेवेपासून वंचित राहत आहेत, हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांच्या निदर्शनास आणून दिले. विभागनिहाय अंमलबजावणी करण्याऐवजी प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांना एसटी बससेवेचा मोफत लाभ देण्याबाबतची अंमलबजावणी करावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. या मागणीनुसार कार्यवाही न झाल्यास शिवसेनेला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही देण्यात आला. दिंडोरी लोकसभा जिल्हाप्रमुख सुनील पाटील, सहसंपर्कप्रमुख धनराज महाले, उपजिल्हाप्रमुख नीलेश पाटील, विलास निरघुडे, अमित पाटील, राजाभाऊ गोतरणे यांच्या शिष्टमंडळाने विभागीय नियंत्रक मैंद यांची भेट घेवून निवेदन दिले.


























































