पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही; शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा समोरूनच काढला आणि शाहिस्तेखानाची बोटेही समोरूनच छाटली. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे सैनिक आहोत. पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही’, असा खरमरीत टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला.

शिवसेनेच्या वतीने जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका आणि खेड, आळंदी विधानसभा मतदारसंघांतील शिवसैनिकांचे मेळावे झाले. या मेळाव्यात खासदार संजय राऊत बोलत होते.

मुख्यमंत्री आमचाच होणार याची भाजपा वाट पाहात बसली होती. एवढेच नव्हे तर त्यांनी फक्त शपथ घ्यायची बाकी ठेवली होती. मात्र झाले वेगळेच; शिवसेनेने त्यांना गनिमी कावा दाखविला. शेवटी 105 पक्षाच्या आमदारांना सत्तेविना हात चोळत बसावे लागले. आम्ही कधी गेलो हे भाजपाला शेवटपर्यंत कळलेच नाही, असे खासदार राऊत यांनी सांगताच एकच हशा उसळला.

 राज्यात जरी तीन पक्षांचे सरकार असले तरी ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांचे सरकार असते. सरकार आपले आहे. शिवसेना दोन्ही पक्षांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वर आहे. ही आपली पॉवर आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आपले आहेत. अजित पवारदेखील आपलेच आहेत. असे खासदार राऊत म्हणाले.

याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, जिल्हाप्रमुख शरद सोनावणे आदी उपस्थित होते.

भाजपला हवे तेच राज्यपाल करतील

‘राज्यपाल हे सरळमार्गी आहेत. त्यांच्याबद्दल आदर, प्रेम आहे. मात्र, ते भाजपचे राज्यसभा सदस्य, प्रचारक होते. त्यामुळे भाजपला जे हवे, तेच ते करतील. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?’ असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या यादीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा सवाल केला.