मरेन पण डरकाळी फोडूनच! चिपळूणातील जंगी स्वागतानंतर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाल्याच्या घटनेनंतर पहिल्यांदाच त्यांचे चिपळूणात आगमन झाले. त्यावेळी शिवसैनिकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. माझा सूर्यास्त जवळ आला असेल, तरीपण मी डरकाळी फोडूनच मरेन असे उद्गार भास्कर जाधव यांनी काढले.

दोन दिवसांपूर्वी आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण, पाग येथील घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यानंतर आमदार भास्कर जाधव हे मुंबईहून रेल्वेगाडीने चिपळूण येथे आले असता रेल्वेस्थानकावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. ‘कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला’, ‘हमारा नेता कैसा हो…. भास्करशेठ जैसा हो’, ‘भास्कर जाधव अंगार है… बाकी सब भंगार है’ अशा घोषणा देण्यात आल्या.

त्यानंतर प्रतिक्रिया देताना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, गेली 40 वर्षे मी विधीमंडळात काम करत आहे. मी आक्रमक जरुर असेन, पण मी कधीही असंसदीय वाक्यांचा वापर केलेला नाही आणि करणार देखील नाही. राजकारण, टीकाटिप्पणी, आरोप होत असतात. ज्या भाषेत टीका व आरोप होतात, त्या भाषेत मी प्रत्युत्तर देत असतो. माझा तो मुळ स्वभाव आहे. मी घरी नसताना काहींनी पळपुटेपणा करत माझ्या घरावर हल्ला केला. त्यावेळी असंख्य शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते माझ्या कुटूंबाची काळजी घेत होते. त्यामुळे मला अजिबात चिंता नव्हती.

आमदार प्रवीण दरेकर यांनी भास्कर जाधव यांचा सूर्यास्त जवळ आला आहे असे विधान केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, माझा सूर्यास्त जवळ आला असेल आणि त्यांना ते माहित असेल तर ते सर्वज्ञानी आहेत. पण एकच सांगतो, वाघ मरताना सहज मरत नाही. मी भास्कर जाधव आहे. मरताना देखील डरकाळी फोडूनच मरेन, असे प्रत्युत्तर भास्कर जाधव यांनी दिले.